सातारा प्रतिनिधी
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सातारा शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा सर्वाधिक फटका स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी बाहेरगावाहून साताऱ्यात आलेल्या विद्यार्थ्यांना बसत असून, जेवणाची सोय बिघडल्याने अनेक विद्यार्थ्यांना गावी परतण्याची वेळ आली आहे. परिणामी शहरातील अभ्यासिका अक्षरशः ओस पडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
सातारा शहरात राज्यसेवा, गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे मोठ्या संख्येने विद्यार्थी वास्तव्यास असतात. परजिल्ह्यातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांचा रोजचा आहार प्रामुख्याने खाणावळींवर अवलंबून असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक खाणावळी चालविणे कठीण झाले आहे. परिणामी काही खाणावळ चालकांनी जेवणाचे दर वाढवले आहेत, तर काहींनी तात्पुरत्या स्वरूपात खाणावळी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
खाणावळी बंद पडल्याने विद्यार्थ्यांसमोर जेवणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करून जेवणाची सोय केली जात असली, तरी त्यातून सर्व विद्यार्थ्यांची गरज भागवणे शक्य होत नाही. उरलेल्या खाणावळींनी दर वाढवल्याने अनेक विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात जेवण मिळणे कठीण झाले आहे. परिणामी काही विद्यार्थी दिवसातून एकदाच जेवण करून भागवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.
या परिस्थितीचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नियमित आणि पौष्टिक आहार मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होत असून अभ्यासाचा दिनक्रम विस्कळीत झाला आहे. विशेषतः बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाच्या समस्येमुळे राहण्याचा खर्च आणि दैनंदिन नियोजन सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी तात्पुरते गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक अभ्यासिका देखील ओस पडल्या आहेत. छत्रपती शिवाजी कॉलेज परिसरातील स्पर्धा परीक्षा केंद्रात यापूर्वी दररोज सुमारे १५० विद्यार्थी अभ्यासासाठी उपस्थित राहत होते. मात्र, सध्या ही संख्या केवळ २० ते २५ विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित राहिल्याचे सांगण्यात येत आहे.
स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक विकास ताटे-देशमुख म्हणाले, “गॅस टंचाईमुळे खाणावळींवर मोठा परिणाम झाला आहे. जेवणाची सोय बिघडल्याने बाहेरगावाहून आलेले अनेक विद्यार्थी परत जात आहेत. अभ्यासासाठी शांत वातावरण आणि नियमित दिनक्रम अत्यंत महत्त्वाचा असतो; मात्र सध्या विद्यार्थ्यांना मूलभूत गरजांनाच तोंड द्यावे लागत आहे.”
दरम्यान, राज्यसेवेची मुख्य परीक्षा ४ एप्रिल रोजी होणार आहे. परीक्षेला अवघे काही दिवस उरले असताना विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या तयारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय पुढील काही दिवसांत गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांच्या भरतीची जाहिरात येण्याची शक्यता असल्याने अनेक विद्यार्थी साताऱ्यात राहून तयारी करत होते.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या भोजन व्यवस्थेची सोय करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकूणच, गॅस टंचाईचा परिणाम केवळ घरगुती किंवा व्यावसायिक क्षेत्रापुरता मर्यादित न राहता शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवरही गंभीरपणे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


