सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील कलाशिक्षक, कलाकार आणि कला क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांचा मोठा मेळावा साताऱ्यात भरत आहे. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ आणि सातारा जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद २८ व २९ मार्च २०२६ रोजी साताऱ्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातील शेकडो कलाशिक्षक या परिषदेत सहभागी होणार असून कला, शिक्षण आणि सृजनशीलतेवर व्यापक मंथन होणार आहे.
परिषदेचे उद्घाटन शनिवार, दि. २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी खासदार ना. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कला आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर अधिकारी, पदाधिकारी आणि कलाकार यावेळी उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कलाशिक्षकांसाठी वैचारिक आणि प्रात्यक्षिक अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध चित्रकार ओंकार पवार, चित्रकार सत्यजित वरेकर तसेच युवा शिल्पकार मंदार लोहार यांची थेट कलाप्रात्यक्षिके हे या परिषदेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. याशिवाय ‘रंगरेषा ते डिझाईन : सृजनात्मक प्रवास’ आणि ‘नवीन शैक्षणिक धोरणातील कलाशिक्षणाचे स्थान’ या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
परिषदेत कला क्षेत्रातील करिअरच्या संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा कलाशिक्षणातील वापर तसेच जागतिक स्तरावरील आर्ट स्टुडिओ व कला क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि कलाध्यापकांचा गौरव सोहळा हा कार्यक्रमातील आणखी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
परिषदेच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, निसर्गचित्र स्पर्धा तसेच कलाशिक्षकांसाठी खुला मंच यांसारखे उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे कला आणि संस्कृतीचा उत्सवच साताऱ्यात अनुभवायला मिळणार आहे.
या परिषदेचा समारोप रविवार, दि. २९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील, शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर तसेच पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा पार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र बाराई यांनी या परिषदेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, बदलत्या शैक्षणिक धोरणात कलेचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी तसेच कलाशिक्षकांचे भविष्य आणि कला शिक्षणाची दिशा यावर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. राज्यातील अधिकाधिक कलाशिक्षक, कलाकार आणि कलाप्रेमींनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या परिषदेसाठी सातारा जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. तसेच अकोला जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष संदीप शेवलकर व सचिव चंद्रकांत वाघ यांनी अकोला जिल्ह्यातील कलाशिक्षकांनी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातून सुभाष धार्मिक, संजय आगाशे, संदीप शेवलकर, चंद्रकांत वाघ, गणेश खानझोडे, संजय गोपनारायण, विठ्ठल इढोळे, विवेक फोकमारे, हनुमंत चव्हाण, उमेश जोशी, संतोष सहारे, उद्धव काळपांडे, संजय तायडे, आनंदा फुलारी, गणेश निमकंडे, राजेश अंभोरे, शिवदास बेलोकार, सुनील देशमुख, गजानन गाडगे, मुकेश गव्हाणकर, महेंद्र कोकणे, मंगेश श्रीवास, राजेश्वर ताले, अनिल आयस्कार, दिपक भुसारी आदी कलाशिक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
राज्यभरातील कलाशिक्षक, कलाकार आणि कला क्षेत्रातील अभ्यासकांसाठी ही परिषद मार्गदर्शक ठरणार असून कला शिक्षणाच्या भविष्यासाठी नवे दिशादर्शन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


