मुंबई प्रतिनिधी
राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, महाराष्ट्राच्या अनेक भागांवर पावसाचे काळे ढग दाटले आहेत. पुढील २४ तास राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असून, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार, तर घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून, राज्यात पावसाची नवी सर सुरू झाली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, २२ जुलैपर्यंत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम राहणार आहे.
हवामान प्रणाली अनुकूल; मान्सूनला पुन्हा बळ
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजस्थानपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याचबरोबर मध्य भारत आणि पूर्व किनारपट्टीच्या परिसरातही विविध चक्रीवादळी प्रणाली कार्यरत आहेत. या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला असून, महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी सुरुवातीला यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने अलर्टमध्ये बदल करत ऑरेंज अलर्ट जारी केला. मंगळवारपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, मुंबई महानगर प्रदेशातील जनजीवनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, रायगड जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी २१ जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र तुलनेने कमी पावसाची शक्यता असून, काही भागांत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढणार असला तरी, जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तुलनेत आगामी पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता हवामान निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील जुलै महिन्यातील पावसाची तूट पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता कमी असल्याचेही संकेत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर पावसाचे रौद्र रूप
पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः डोंगराळ भाग आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे घाट परिसरातील प्रवास करताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याउलट सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह सरी
मराठवाड्यात मंगळवारी बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र, खान्देशातही पावसाची हजेरी
नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्याच्या इतर भागांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या तिन्ही जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मात्र कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
विदर्भात पावसाची प्रतीक्षा कायम
एकीकडे राज्याच्या बहुतांश भागांत मान्सून सक्रिय होत असताना विदर्भात मात्र पावसाचा जोर अद्याप अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, या भागात मुसळधार पावसाचा विशेष इशारा देण्यात आलेला नाही.
पुढील २४ तास महत्त्वाचे
राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढत असल्याने पुढील २४ तास महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. मुसळधार पावसाच्या काळात नदी-नाले, धरणे आणि धोकादायक घाटमार्गांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


