नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून राजधानी दिल्लीत सोमवारी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. तब्बल तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.

नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. त्यांच्या सोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, रणदीपसिंह सुरजेवाला यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान हातांना काळ्या पट्ट्या बांधून नेत्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा करण्याची मागणी लावून धरली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्याशी दोन ते तीन वेळा चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यास आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केल्याचे सांगितले. मात्र, चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करत आंदोलक नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिस आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये काही काळ झटापट झाली. या गोंधळात राहुल गांधी यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी बसमधून दिल्लीतील मॉडेल टाऊन पोलीस ठाण्यात नेले. या कारवाईनंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे देशाचे लक्ष लागले आहे.
निवासस्थानाबाहेर राडा : घटनाक्रम
दुपारी ३.३० वाजता – राहुल गांधी, प्रियांका गांधी पंतप्रधान निवासस्थानाकडे रवाना
दुपारी ४.०० वाजता – पंतप्रधान निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलनाला सुरुवात
सायं. ५.०० वाजता – काँग्रेस नेत्यांची जोरदार घोषणाबाजी
सायं. ६.०० वाजता – केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची राहुल गांधींसोबत चर्चा
सायं. ६.१५ वाजता – सरकार आणि राहुल गांधी यांच्यातील चर्चा निष्फळ
सायं. ६.४५ वाजता – पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू
सायं. ६.५५ वाजता – प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
सायं. ७.०५ वाजता – राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
सायं. ७.०८ वाजता – झटापटीत राहुल गांधी यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत


