मुंबई प्रतिनिधी
नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा व्हिडिओ शेअर करत राज ठाकरे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली. ‘हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे,’ अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली.
लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा आरोप करत, त्यानंतर आंदोलकांवर झालेल्या कारवाईवरून सरकार रास्त मागण्यांसाठी होणारी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सविस्तर पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सरकार सांगत आहे. मात्र, त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेण्यात आले, त्यावरून सरकारला त्यांच्या आरोग्याची खरोखरच काळजी होती का, असा प्रश्न निर्माण होतो,’ असे त्यांनी म्हटले.
‘सरकारला आंदोलने चिरडण्यात धन्यता वाटते’
‘त्यानंतर आंदोलकांवर करण्यात आलेला बेफाम लाठीचार्ज पाहता, हे सरकार रास्त मागण्यांसाठी होणारी आंदोलने चिरडण्यात धन्यता मानत असल्याचे दिसते. त्यामुळे हे सरकारच मानसिक रुग्ण झाले असून, त्यांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली. ‘धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले आहेत की त्यांचा राजीनामा घेणे हे सरकारला स्वतःचे अपयश वाटत आहे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘परीक्षा पे चर्चा’ऐवजी विद्यार्थ्यांशी थेट चर्चा करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, ‘पंतप्रधान परीक्षा पे चर्चा करतात ना? मग आता त्यांनी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांशी थेट चर्चा करावी. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा अहंकार यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश अधिक महत्त्वाचा आहे.’
विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून, त्यांच्याशी संवाद साधून प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. आंदोलन दडपण्याऐवजी सरकारने संवेदनशीलता आणि समजूतदारपणा दाखवावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
‘आंदोलन केवळ नीट परीक्षेपुरते मर्यादित नाही’
विद्यार्थ्यांचे सध्याचे आंदोलन हे केवळ नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार किंवा एका मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरते मर्यादित नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. ‘हे आंदोलन लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल निर्माण झालेल्या असंतोषाचे प्रतिबिंब आहे,’ असे ते म्हणाले.
महागाई, बेरोजगारी, उद्योगधंद्यांबाबतची सरकारी धोरणे, जंगलतोड, विकासाच्या नावाखाली होणारे प्रकल्प आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील ताण अशा विविध प्रश्नांवरून जनतेमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘आंदोलकांना ज्या पद्धतीने मारहाण केली जात आहे, तरीही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. हे धैर्य केवळ एका मुद्द्यावरच्या रागातून आलेले नाही, तर देशातील एकूण परिस्थितीबद्दल निर्माण झालेल्या नैराश्यातून आले आहे,’ असे राज ठाकरे यांनी म्हटले.
‘आंदोलन चिरडण्यात पुरुषार्थ नसतो’
सरकारने आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी संवादातून मार्ग काढावा, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘आंदोलन चिरडण्यात कोणताही पुरुषार्थ नसतो. आंदोलन होऊ न देण्यात आणि झालेच तर ते सामंजस्याने सोडवण्यात खरा मोठेपणा असतो. हा मोठेपणा सर्वोच्च व्यवस्थेने दाखवायचा असतो,’ असे त्यांनी म्हटले.
‘लोकपाल आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जाईल’
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केंद्र सरकारच्या भवितव्याबाबतही सूचक इशारा दिला. ‘लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागेल,’ असा दावा त्यांनी केला.
‘2018-19 पासून मी जनतेला सांगत होतो की, मी या सरकारबद्दल काय बोलतोय हे आज तुम्हाला कदाचित समजणार नाही. पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल, त्या दिवशी मी काय सांगत होतो हे समजेल. आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
श्रीलंका, अरब स्प्रिंगचा संदर्भ
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करताना राज ठाकरे यांनी श्रीलंका, अरब स्प्रिंग आणि नेपाळमधील आंदोलनांचे उदाहरण दिले. ‘शेजारच्या श्रीलंकेत 2022 मध्ये विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभे केले. 2011 मधील अरब स्प्रिंग आणि नेपाळमधील आंदोलनांमध्येही विद्यार्थ्यांचा असंतोष महत्त्वाचा होता. जयप्रकाश नारायण यांनी उभ्या केलेल्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाचाही पाया विद्यार्थ्यांच्या असंतोषात होता,’ असे ते म्हणाले.
देशातील विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या संघर्षाचे कौतुक करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या धैर्याला सलाम केला.
‘मनसेचा आंदोलनाला पाठिंबा कायम’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला आणि आंदोलकांच्या मागण्यांना यापूर्वीपासूनच पाठिंबा असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. नीटसारख्या परीक्षांमध्ये केंद्र सरकारने अनावश्यक हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका मनसेने यापूर्वीच घेतली होती, असेही त्यांनी नमूद केले.
‘अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा व्हायलाच हवा आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता यायलाच हवी,’ अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकार आणि आंदोलकांमध्ये निर्माण झालेला तणाव कायम असतानाच राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही या मुद्द्यावर नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. आंदोलनाचा प्रश्न लाठीचार्ज आणि दडपशाहीने नव्हे, तर चर्चेतून आणि संवादातून सोडवण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.


