ठाणे प्रतिनिधी
ठाणे : लोणावळा येथील एकविरा देवी मंदिर येथे होणाऱ्या यात्रेनिमित्त मुंबई-पुणे महामार्गावर तीन दिवस टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे सलग तीन दिवस ही टोलमाफी लागू राहणार आहे.
देवी भक्तांसाठी आनंदाची बातमी — एकविरा आईच्या यात्रेसाठी तीन दिवस टोल माफ! pic.twitter.com/P7X4os90Pl
— Balya Mama – Suresh Rekha Gopinath Mhatre (@MeBalyaMama) March 22, 2026
राज्यातील आगरी-कोळी समाजाचे कुळदैवत असलेल्या एकविरा देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर तसेच रायगड जिल्ह्यातील हजारो भाविक लोणावळा येथे दर्शनासाठी जात असतात. मोठ्या संख्येने भाविक वाहनांनी मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करत असल्याने टोलमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तसेच टोल नाक्यांवर अनेकदा वादाचे प्रसंग आणि वाहतूक कोंडीही होत होती.
या पार्श्वभूमीवर टोलमाफीची मागणी करण्यात आली होती. महामार्ग व टोल प्रशासनाने ही मागणी मान्य केली असून यात्रेच्या तीन दिवसांत टोलमाफी लागू राहणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी दिली.
दरम्यान, टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचे अधिकृत पत्र आवश्यक असणार आहे. हे पत्र टोल नाक्यांवर दाखविल्यानंतर एकविरा देवीच्या भाविकांना टोलमाफी दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


