ठाणे प्रतिनिधी
कालबाह्य आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकणारे अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी वळवल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या भिवंडीतील सरवली येथील गोदामावर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला असून, संबंधित गोदामातून अन्नपदार्थांची विक्री आणि वितरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
यापूर्वीच या प्रकरणी ॲमेझॉनच्या फॅसिलिटी मॅनेजरसह दोन जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, कालबाह्य अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपासणीत १.५ टन मुदतबाह्य अन्नसाठा जप्त
भिवंडीतील सरलगाव परिसरात असलेल्या ॲमेझॉन रिटेल इंडियाच्या गोदामाची २४ जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर आणि त्यांच्या पथकाने तपासणी केली होती. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील अनेक तरतुदींचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले.
गोदामात तब्बल १.५ टन मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा सापडला. हा साठा मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकतो, असे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच यापूर्वी मुदतबाह्य अन्नपदार्थांची कायदेशीर पद्धतीने विल्हेवाट लावल्याचे कोणतेही अधिकृत दस्तऐवज किंवा तांत्रिक नोंदी कंपनीकडे उपलब्ध नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले.
बाजारातील जप्त साठ्याचा धागा ॲमेझॉनच्या गोदामापर्यंत
काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी शहरातील आठ ठिकाणी छापे टाकून ४५.७४ लाख रुपयांचा मुदतबाह्य अन्नसाठा जप्त केला होता. हा साठा थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात असल्याचे समोर आले होते.
या प्रकरणाच्या पुढील तपासात बाजारात सापडलेल्या या अन्नसाठ्याची पुरवठा साखळी ॲमेझॉन रिटेल इंडियाच्या सरवली येथील गोदामाशी संबंधित असल्याचे संशयास्पद पुरावे मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली. नियमानुसार नष्ट करण्यासाठी देण्यात आलेला साठा कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करून पुन्हा बाजारात आणल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे.
व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा
मुदतबाह्य अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी ॲमेझॉन रिटेल इंडियाने आर. के. ट्रेडर्स या एजन्सीची नियुक्ती केली होती. मात्र, या साठ्याची नियमबाह्य पद्धतीने बाजारात विक्री झाल्याचा आरोप झाल्यानंतर एजन्सीचे मालक रहमान के. तसेच ॲमेझॉनचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर कोनूर यांच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित
जनहित आणि सार्वजनिक आरोग्याचा विचार करून परिमंडळ-१० चे सहायक आयुक्त तथा परवाना अधिकारी योगेश ढाणे यांनी सरवली येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि. या आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांनी कारवाईला दुजोरा देत, ही कारवाई केवळ संबंधित गोदामापुरती मर्यादित असून, या गोदामातून कोणतेही अन्नपदार्थ विक्रीसाठी पाठवता येणार नाहीत, असे स्पष्ट केले.
ई-कॉमर्स कंपन्यांना प्रशासनाचा कडक इशारा
मुदतबाह्य अन्नपदार्थांची विल्हेवाट अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसारच लावणे प्रत्येक अन्न व्यावसायिक आणि ई-कॉमर्स कंपनीसाठी बंधनकारक आहे. अशा वस्तू कोणत्याही परिस्थितीत बाजारात विक्री किंवा वितरणासाठी पाठविल्या जाऊ नयेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना रद्द करण्यासोबतच फौजदारी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
अन्नपदार्थ खरेदी करताना उत्पादनाची तारीख आणि ‘बेस्ट बिफोर’ अथवा मुदत संपण्याची तारीख तपासणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. बाजारात किंवा कोणत्याही विक्री केंद्रावर मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री अथवा साठवणूक होत असल्याचे आढळल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


