ठाणे प्रतिनिधी
राज्यातील लाखो शिक्षक भरतीच्या इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. शनिवारी (२८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या प्रकरणामुळे अखेर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातून तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून, या संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे.
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी टीईटी परीक्षा यंदा राज्यभरातील ३७ परीक्षा केंद्र विभागांतील १,७२८ केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे सहा लाख १२५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र पेपरफुटीच्या गंभीर प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे.
भिवंडीत सापळा रचून तिघांना ताब्यात
पेपरफुटीची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक माहितीनुसार, भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून पेपर लीक करणाऱ्या टोळीतील तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींची चौकशी केली जात आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.
पारदर्शक परीक्षा हेच उद्दिष्ट : परीक्षा परिषद
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शिक्षक पात्रता परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी, हा परीक्षा परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. पेपरफुटीच्या घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर नव्या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल.
उमेदवारांना दिलासा; पुन्हा अर्ज किंवा शुल्क नाही
परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नसल्याचेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांची नोंदणी वैध राहणार असून, नव्या तारखेला त्यांनाच परीक्षेला बसता येणार आहे.
प्रिया शिंदे यांनी सांगितले की, “या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराकडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही. पुनर्परीक्षेसाठी स्वतंत्र नोंदणी करण्याचीही गरज नाही.”
शिक्षक भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
राज्यात यापूर्वीही विविध भरती परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. आता शिक्षक पात्रता परीक्षेलाही पेपरफुटीचा फटका बसल्याने परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे लाखो उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, पेपरफुटीमागील संपूर्ण सूत्रधार कोण, प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली आणि या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


