नवी दिल्ली:
काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सुमारे २५ खासदारांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीस राजस्थान पोलिसांनी कोटा येथून अटक केली. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेला धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज सिंह (रा. अमेरा, कोटा) या व्यक्तीने इंस्टाग्रामवर धमकीचा व्हिडीओ अपलोड केला होता. संबंधित अकाऊंट आता निष्क्रिय करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आपण करणी सेनेचा प्रवक्ता असल्याचा दावा आरोपीने केला. तथापि, संघटनेने त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याबाबत काही खासदारांनी केलेल्या कथित वर्तनाचा राग आल्याने आपण व्हिडीओ पोस्ट केला. धमकीचा मजकूर अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी प्रकरणाची गुन्हा म्हणून नोंद केली.
कोटा पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १७० अंतर्गत राज सिंहला अटक करण्यात आली आहे. धमकीचा व्हिडीओ व सोशल मीडिया हँडलचा तपास सुरू असून आरोपीची सखोल चौकशी केली जात आहे.
दरम्यान, करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराना यांनी स्वतंत्र व्हिडीओद्वारे या घटनेचा निषेध केला. करणी सेना निषेधासाठी शांततामय मार्गांचा अवलंब करते, कोणालाही ठार मारण्याची धमकी देणे ही संघटनेची भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी या दोन्ही नेत्यांविषयी आदर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
धमकीच्या प्रकरणामुळे संसदीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून केंद्र व राज्य यंत्रणांनी सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण आशयावर अधिक कडक कारवाईची गरज व्यक्त केली आहे.


