भाईंदर प्रतिनिधी
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला-केंद्रित धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. महिलांचा आर्थिक आणि सामाजिक सहभाग वाढल्याशिवाय अर्थव्यवस्थेला अपेक्षित गती मिळू शकत नाही. त्यामुळे महिलाच अर्थसंकल्पाचे दुसरे आणि तितकेच महत्त्वाचे चाक आहेत, असे प्रतिपादन देवेंद्र फडवणीस यांनी केले.
ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ या दोन दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ८ व ९ मार्च रोजी भाईंदर येथील रामभाऊ महागळी प्रबोधिनीच्या प्रांगणात ही परिषद होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पोपटराव पवार मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगातील विकसित देशांचा अभ्यास केला असता महिलांना मानवी संसाधन व्यवस्थापनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्याने विकासाला गती मिळाल्याचे दिसून येते. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशात महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी विविध धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे. महिलांना उद्योग, व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात चौथ्या क्रमांकावर असून ती लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा सकारात्मक परिणाम
देशात काही काळ मुलगा-मुलगी भेदाची प्रवृत्ती वाढत असल्याची चिंता व्यक्त होत होती. मात्र केंद्र सरकारच्या बेटी बचाव बेटी पढावया उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. आज महिला विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी ‘लखपती दीदी’सारख्या उपक्रमांनाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महिला केंद्रित लोकशाहीकडे वाटचाल
महिलांना राजकीय क्षेत्रात अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी लोकसभा निवडणुकांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशाच्या लोकशाही व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणामुळे महिलांचे नेतृत्व मोठ्या प्रमाणात पुढे येत असून आगामी काळात देशाची वाटचाल महिला-केंद्रित लोकशाहीकडे होईल. २०२९ नंतर या बदलांचे स्पष्ट चित्र दिसून येईल, असा दावाही फडणवीस यांनी केला.


