मुंबई प्रतिनिधी
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार असून क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम कडे लागले आहे. इंडियन क्रिकेट टीम आणि न्यूझीलंड क्रिकेट टीम यांच्यातील ही प्रतिष्ठेची लढत ८ मार्च रोजी रंगणार असून, या सामन्यातील संभाव्य गेमचेंजर कोण ठरणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या सामन्यात सर्वाधिक चर्चा होत आहे ती भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनआणि न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर फिन एलन यांच्या फलंदाजीची. दोन्ही खेळाडूंची अलीकडील कामगिरी पाहता अंतिम सामन्याचे चित्र त्यांच्या खेळीवर अवलंबून राहू शकते, असे क्रिकेटविश्लेषकांचे मत आहे.
उपांत्य फेरीत अॅलनने केलेली स्फोटक खेळी अद्याप चर्चेत आहे. त्याने केवळ ३३ चेंडूत शतक झळकावत टी-२० विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम नोंदवला. या धडाकेबाज खेळीमुळे न्यूझीलंडला अंतिम फेरी गाठण्यात मोठी मदत झाली.
दुसरीकडे, भारताच्या सॅमसननेही उपांत्य फेरीत जबरदस्त फटकेबाजी करत ८९ धावांची दमदार खेळी साकारली. बाद फेरीत भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली असून, भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात त्याची खेळी निर्णायक ठरली.
आकडेवारीकडे नजर टाकली तर अॅलन थोडासा आघाडीवर असल्याचे दिसते. त्याने ६० डावांत १६५४ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १७१ पेक्षा अधिक आहे. त्याच्या नावावर तीन शतके आणि सात अर्धशतके असून १४५ चौकार व ११५ षटकारांच्या जोरावर त्याने आपली आक्रमक शैली सिद्ध केली आहे.
सॅमसनची कामगिरीही तितकीच प्रभावी आहे. त्याने ५३ डावांत १३१० धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट सुमारे १५५ आहे. त्याच्या नावावर तीन शतके आणि पाच अर्धशतके असून ११० चौकार व ७६ षटकारांच्या माध्यमातून त्याने संघाला अनेकदा दमदार सुरुवात करून दिली आहे.
अहमदाबादमध्ये होणाऱ्या या हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात या दोन्ही फलंदाजांची सुरुवातीची खेळी निर्णायक ठरू शकते. सॅमसन किंवा अॅलन यापैकी कोणाचाही बॅट चालला, तर सामना क्षणार्धात एका बाजूला झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात ‘ओपनर्सची ही टक्कर’ चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.


