मुंबई प्रतिनिधी
राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारतर्फे त्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यात येणार असून प्रशासकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी ‘अजित पवार गतिमान नागरी सन्मान’ हा पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. अजित पवार यांचे राज्याच्या अर्थकारणातील योगदान अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, “अजितदादा आज आपल्यात नसले तरी राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. अर्थसंकल्पाशी त्यांचे नाते अतिशय घट्ट होते. त्यांनी तब्बल ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला.”
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, अजित पवार हे शिस्तप्रिय, कामसू आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. प्रशासनातील कामकाज वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्याची त्यांची कार्यशैली राज्यातील अनेक अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांच्या याच गतिमान कार्यपद्धतीचा वारसा जपण्यासाठी ‘अजित पवार गतिमान नागरी सन्मान’ हा पुरस्कार सुरू करण्यात येणार असून नागरी सुविधा, शहरी प्रशासन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जाईल.
तसेच अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा भव्य स्मारक प्रकल्प राज्य सरकार उभारणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. हा अर्थसंकल्प दिवंगत अजित पवार यांना समर्पित असल्याचे सांगत त्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित सदस्यांनी बाके वाजवून निर्णयाचे स्वागत केले.
दरम्यान, २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या खासगी विमानाचा धावपट्टीजवळ अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागल्याने हा अपघात भीषण ठरला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षारक्षक विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्राथमिक चौकशी सुरू केली होती. दरम्यान, अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका करत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. राज्याच्या अर्थकारणाला गती देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे स्मारक आणि जाहीर करण्यात आलेला पुरस्कार हा त्यांच्या कार्याला राज्य सरकारकडून दिलेला मानाचा मुजरा मानला जात आहे.


