मुंबई प्रतिनिधी
“दादांसारख्या वादळासोबत मी ४० वर्षे संसार केला आहे. त्यामुळे ही जबाबदारी कठीण असली तरी अशक्य नाही,” असा निर्धार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्यक्त केला. हा सन्मान केवळ माझा नसून तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा असल्याची भावना त्यांनी मांडली.
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पहिल्याच भाषणात त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना भावनिक स्वर घेतला. “त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही. शेतकरी, युवक, महिला आणि विकासासाठी त्यांनी झटत आयुष्य व्यतीत केले. त्यांची स्वप्ने अपूर्ण राहू देणार नाही; आपण सर्वांनी मिळून ती अधिक उंचीवर नेऊ,” असे त्यांनी सांगितले.
“दादा आपल्यात नाहीत हे मन मानायला तयार नाही; मात्र वास्तव स्वीकारून पुढे जावे लागेल. त्यांनी घडवलेला कार्यकर्ता, जिद्द आणि शिस्त हीच राष्ट्रवादीची ताकद आहे,” असे सांगत पक्ष संघटन दृढ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांशी तडजोड न करता समाजातील कोणताही घटक वाऱ्यावर सोडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
३० जून २०२३ रोजी अजित पवार यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अल्पावधीत संघटना बळकट केली, विविध निवडणुकांत पक्षाची कामगिरी उंचावली आणि राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व सिद्ध केले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. “पुन्हा एकदा पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी आणि शहरी भागात संघटन वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असल्याच्या भावनेतून काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या प्रवासात कोणीही मागे राहू नये, यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगून “झुकणार नाही, माघार घेणार नाही; घेतलेला वसा टाकणार नाही,” अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.


