मुंबई प्रतिनिधी
वांद्रे | ड्रग्समुक्त मुंबई’चा नारा देण्यात येत असताना वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांची उघडपणे विक्री होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. स्थानकाच्या खालील भागात, तिकीट खिडकीजवळ तसेच बेरामपाडा, नौपाडा, गरीबनगर आणि गोळेबार परिसरात हेरॉईनसारख्या घातक अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बांद्रा ईस्ट में ड्रग्स माफिया पर सवाल, कार्रवाई क्यों नहीं?
मुंबई के बांद्रा ईस्ट रेलवे स्टेशन इलाके में कथित तौर पर ड्रग्स की बिक्री को लेकर गंभीर सवाल उठ रहे हैं।
स्थानीय लोगों का आरोप है कि एक महिला और उसके सहयोगी लंबे समय से स्टेशन परिसर के नीचे और टिकट काउंटर के पास… pic.twitter.com/KACCKHxUkG
— SUDHAKAR EDWIN NADAR (@nadarsudhakar29) February 26, 2026
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात स्थानक परिसरातील परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, एका महिलेसह तिचे काही साथीदार गेल्या काही महिन्यांपासून या भागात अमली पदार्थांचा काळाबाजार चालवत आहेत.
काही महिन्यांपूर्वी स्थानिकांनी अमली पदार्थ विरोधी पथकाकडे तक्रार केल्यानंतर छापेमारी करून एका महिलेला अटक करण्यात आली होती. तिच्याकडून हेरॉईन जप्त करण्यात आले होते. मात्र, ही कारवाई तात्पुरती ठरल्याचे दिसून येत आहे. संबंधित महिला आणि तिचे साथीदार जामिनावर सुटून पुन्हा त्याच परिसरात सक्रिय झाल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.
हा भाग मुंबई रेल्वे पोलीस आणि निर्मल नगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीत येतो. दोन पोलीस ठाण्यांच्या सीमारेषेतील तांत्रिक अडचणी किंवा स्थानिक स्तरावरील समन्वयाच्या अभावामुळेच विक्रेत्यांचे धाडस वाढत असल्याची चर्चा आहे.
वांद्रे पूर्वेकडील हा परिसर शाळा आणि महाविद्यालयांच्या जवळ असल्याने तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. काही दिवस कारवाई दिसते; त्यानंतर पुन्हा तेच चेहरे दिसू लागतात,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.
राज्य शासनाने अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात कठोर कायद्यांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, संवेदनशील मानल्या जाणाऱ्या वांद्रे पूर्व परिसरात विक्री सुरू राहिल्याने प्रशासनाच्या दक्षतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.


