मुंबई : प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आणि गेली दोन वर्षे रखडलेला मुंबई सेंट्रल येथील ब्रिटिशकालीन ‘बेलासिस’ उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या, गुरुवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता या पुलाचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने हे आव्हानात्मक काम निविदेतील मुदतीपूर्वी चार महिने आधीच पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतचा १३० वर्षांपूर्वीचा जुना पूल धोकादायक ठरवून पाडण्यात आला होता. त्यानंतर ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल या परिसरातील पूर्व-पश्चिम वाहतुकीवर मोठा ताण आला होता. आता या नवीन पुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग आणि महालक्ष्मी स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
विक्रमी वेळेत पूर्णत्वास
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पूल विभागाने या पुलाचे काम केवळ १५ महिने ६ दिवसांत पूर्ण केले. या कामासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये कार्यादेश देण्यात आला होता. कामात अनेक तांत्रिक अडचणी, ‘बेस्ट’च्या वाहिन्यांचे स्थलांतर आणि न्यायालयीन खटले असूनही, पावसाळ्यातही काम सुरू ठेवून अभियंत्यांनी हे उद्दिष्ट साध्य केले.
असा आहे नवा पूल
• एकूण लांबी: ३३३ मीटर (पूर्व बाजू १३८ मीटर, पश्चिम बाजू १५७ मीटर, रेल्वे हद्दीत ३६ मीटर).
• रुंदी: ७ मीटरचा वाहतूक मार्ग आणि दोन्ही बाजूंना पादचारी पथ.
• वैशिष्ट्य: पुलाची भार चाचणी (Load Test) आणि रेल्वेचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाले असून तो वाहतुकीस पूर्णपणे सुरक्षित आहे.
प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर रितू तावडे यांच्यासह पालकमंत्री आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत आणि स्थानिक आमदार अमीन पटेल उपस्थित राहणार आहेत.


