मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शासकीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना दिलासा देत राज्य शासनाने महागाई भत्त्यात (डीए) तीन टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयानुसार महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात येणार असून तो जुलै २०२५ पासून लागू राहील, अशी माहिती वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत दिली.
या वाढीमुळे सुमारे ५.९६ लाख कार्यरत शासकीय कर्मचारी तसेच ८.१२ लाख निवृत्तीवेतनधारकांना थेट लाभ होणार आहे. महागाई भत्त्यातील वाढीमुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
थकबाकी टप्प्याटप्प्याने
जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मार्च २०२६ मध्ये अदा करण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश लवकरच काढण्यात येतील, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध
राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या हितरक्षणासाठी कटिबद्ध असून आर्थिक शिस्त राखत कर्मचारी कल्याणाला प्राधान्य देण्यात येत आहे, असे महाराष्ट्र शासन तर्फे नमूद करण्यात आले. या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर होत असतानाच केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेलाही वेग आला असून आगामी काळात वेतनवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


