नवी दिल्ली:
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या जाज्वल्य स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि सुशासनपर परंपरेचे स्मरण केले. समाजमाध्यमांवरील संदेशातून शिवरायांच्या कार्याचा गौरव करत देशवासीयांना शुभेच्छा देताना त्यांनी संस्कृत सुभाषित उद्धृत करून आदर्श राज्यकारभाराचा संदेश दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, विलक्षण रणनीतीकार आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते अशा महान व्यक्तिमत्त्वाला आम्ही साष्टांग नमन करतो.
त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देईल, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि न्याय व स्वाभिमानाची… pic.twitter.com/JI9dSJCedg
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2026
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात शिवाजी महाराजांचा उल्लेख “दूरदर्शी नेते आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते” असा केला. “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महान योद्धे नव्हते; ते कुशल प्रशासक आणि विलक्षण रणनीतीकार होते. जनतेच्या कल्याणाला सर्वोच्च मानून त्यांनी आयुष्य समर्पित केले. त्यामुळे त्यांचे जीवन आजही भारतासाठी पथप्रदर्शक आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
सुशासनाचे तत्त्व स्पष्ट करताना त्यांनी पुढील संस्कृत श्लोक उद्धृत केला-
“गोपायितारं दातारं धर्मनित्यमतन्द्रितम्।
अकामद्वेषसंयुक्तमनुरज्यन्ति मानवाः।।’’
याचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, जो राजा प्रजेचे रक्षण करतो, दानशूर आहे, धर्मपालनात तत्पर आहे आणि राग-द्वेषापासून मुक्त आहे, त्याच्यावर जनता मनापासून प्रेम करते. शिवरायांची न्यायनिष्ठा आणि स्वाभिमानाची परंपरा आजच्या समाजाला अधिक सक्षम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
छत्रपति शिवाजी महाराज ने जन-जन के कल्याण को सदैव सर्वोपरि रखा और उनकी सुरक्षा के लिए स्वयं को समर्पित कर दिया। इसलिए उनका जीवन आज भी भारतवर्ष के लिए पथ-प्रदर्शक बना हुआ है।
गोपायितारं दातारं धर्मनित्यमतन्द्रितम्।
अकामद्वेषसंयुक्तमनुरज्यन्ति मानवाः।। pic.twitter.com/4yioRdkbdH
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2026
दिल्लीतील शिवजयंती सोहळे
राजधानीत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोपरनिकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात राज्य सरकारतर्फे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात महाराजांच्या प्रतिमेची पालखी काढून शिवजन्मोत्सव साजरा केला जातो.
तसेच लाल किल्ला येथे सांस्कृतिक मंत्रालयामार्फत शिवरायांच्या युद्धनीतीवर आधारित महानाट्य वा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. मिंटो रोड परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी स्थानिक मराठी संघटनांकडून विशेष पूजाविधी होतो.
आग्र्यातील स्मरणसोहळा
दिल्लीजवळील आग्रा किल्ला येथील दिवाण-ए-आममध्ये पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने शिवजयंती कार्यक्रम आयोजित केला जातो. औरंगजेबाला दिलेल्या ऐतिहासिक आव्हानाचे स्मरण म्हणून हा सोहळा दिल्ली-एनसीआरमधील शिवभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरतो.
शिवजयंतीनिमित्त देशभरातून शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन केले जात असताना पंतप्रधानांच्या संदेशातून त्यांच्या आदर्श राज्यकारभाराच्या परंपरेचा पुनःस्मरण झाला आहे.


