नवी दिल्ली :
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सात वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात गँगस्टर महफूज उर्फ बॉबी कबूतर याला अटक करत मोठे यश मिळवले आहे. बॉबी कबूतर हा लॉरेन्स बिश्नोई आणि हाशिम बाबा टोळीचा विश्वासू साथीदार मानला जातो. त्याच्या अटकेमुळे अनेक हाय-प्रोफाइल गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मूसेवालाच्या हत्येपूर्वी केली होती रेकी
२९ मे २०२२ रोजी झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येपूर्वी बॉबी कबूतरने त्यांच्या हालचालींची सखोल रेकी केल्याचा धक्कादायक खुलासा तपासात समोर आला आहे. त्याने गोळा केलेली माहिती परदेशात बसलेल्या गोल्डी बराड आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीपर्यंत पोहोचवण्यात आली. त्यानंतर शूटरांनी दिवसाढवळ्या मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
दिशा पाटनीच्या घरावरील गोळीबारात सहभाग
बॉबी कबूतरचे गुन्हेगारी जाळे पंजाबपुरते मर्यादित नसून उत्तर प्रदेशातही त्याचे संबंध असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी बरेली येथील सिव्हिल लाइन्स परिसरात अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या निवासस्थानी दोन दुचाकीस्वारांनी १० ते १५ राऊंड गोळीबार केला होता. या हल्ल्यासाठी वापरलेली अत्याधुनिक परदेशी शस्त्रे बॉबीनेच उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. सुदैवाने या घटनेत दिशा पाटनी यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले. संबंधित दोन शूटरांचा यापूर्वीच एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे.
हाशिम बाबाचा उजवा हात
बॉबी कबूतर हा सध्या तिहार कारागृहात असलेल्या कुख्यात गँगस्टर हाशिम बाबाचा निकटवर्तीय मानला जातो. दिल्लीतील सीलमपूर येथील दुहेरी हत्याकांड तसेच ग्रेटर कैलाश परिसरातील नादिर शाह हत्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. गेल्या सात वर्षांपासून तो बनावट ओळखीचा वापर करून पोलिसांना चकवा देत होता. अखेर टेक्निकल सर्व्हिलन्सच्या मदतीने स्पेशल सेलने त्याला अटक केली.
दरम्यान, दिशा पाटनी यांच्या घरावरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारत धार्मिक कारणांचा उल्लेख केला होता. मात्र, पोलिस आता या प्रकरणामागील खरा सूत्रधार, खंडणीचा अँगल आणि टोळीतील अंतर्गत संबंध यांचा सखोल तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या या कारवाईमुळे उत्तर भारतातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोठा आघात बसल्याचे मानले जात आहे.


