नवी दिल्ली वृत्तसंस्था
दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. पवार कुटुंबीयांची दिल्लीतील उपस्थिती, तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका यामुळे या चर्चांना नवे अधिष्ठान मिळाले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या त्यांच्या पुत्र पार्थ व जय पवार यांच्यासह दिल्लीत दाखल झाल्या. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते प्रफुल्ल पटेल हेही राजधानीत उपस्थित आहेत. अधिकृतरीत्या विविध कार्यक्रम व शिष्टाचार भेटींचे कारण सांगितले जात असले, तरी राजकीय पातळीवर महत्त्वाच्या चर्चा घडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी ही भेट झाल्याचे तटकरे यांनी सांगितले. “उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा वहिनी दिल्लीमध्ये आल्या. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन दिले,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
मात्र या भेटीच्या राजकीय अर्थाबाबत चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे बारकाईने पाहिले जात आहे.
विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलताना तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “विलिनीकरणाचा प्रश्न आमच्यासाठी तितकासा सोपा नाही. आम्ही भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) घटक आहोत, तर दुसरा गट काँग्रेसप्रणित संयुक्त प्रगत आघाडीसोबत (युपीए) आहे. अशा परिस्थितीत विलिनीकरण होणार असेल, तर त्यामागील राजकीय भूमिका स्पष्ट व्हावी लागेल,” असे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांनी यापूर्वीही भाजपसोबत स्थिर सरकारची भूमिका सातत्याने मांडली होती, याची आठवण करून देताना तटकरे म्हणाले की, २०१४ ते २०१९ या कालखंडातही त्यांनी तीच भूमिका घेतली होती. “तीन पक्षांच्या आघाडीपेक्षा दोन पक्षांचे सरकार अधिक कार्यक्षम ठरेल, असे दादांचे मत होते,” असे त्यांनी नमूद केले.
२०१९ मधील देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या अल्पकालीन शपथविधीचा संदर्भही त्यांनी दिला. “भाजपसोबत जाण्याबाबत पक्षात चर्चा होत होती. मात्र निर्णय होत नसल्याने २०२३ मध्ये आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो,” असे त्यांनी सांगितले.
तथापि, शरद पवार यांच्या भूमिकेबाबत विचारले असता तटकरे यांनी सावध भूमिका घेतली. “इतरांनी कोणती राजकीय दिशा घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, दिल्लीतील हालचालींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चेची धूळ उडाली आहे. विलिनीकरणाच्या शक्यतेला प्रत्यक्षात आकार येतो की ही केवळ राजकीय कयासबाजी ठरते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


