नागपूर प्रतिनिधी
वाढता गुन्हेगारीचा आलेख आणि कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे जीवघेणे हल्ले लक्षात घेऊन नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी, विशेष तपासणी आणि वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता कर्तव्यावर असताना ‘सर्व्हिस गन’ बाळगणे बंधनकारक करण्यात आले असून, पोलीस आयुक्तांनी गुरुवारी यासंबंधीचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
शहरात नाकाबंदी आणि वाहन तपासणी दरम्यान अनेकदा गुन्हेगार, संशयित व्यक्ती किंवा वाहतूक नियम मोडणारे चालक पोलिसांच्या कारवाईला हिंसक विरोध करतात. अनेक घटनांमध्ये वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की, मारहाण आणि गंभीर हल्ल्यांचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, ऑन-ड्यूटी पोलिसांना तात्काळ आत्मसंरक्षण करता यावे आणि कायदा-सुव्यवस्था राखताना त्यांच्या सुरक्षेची खात्री पटावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक पोलीसदेखील गुन्हेगारी नियंत्रणाच्या आघाडीवर काम करत असल्याने त्यांना आवश्यक सुरक्षा साधनांनी सुसज्ज करणे ही काळाची गरज असल्याचे आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छ गणवेश, शिस्तबद्ध वर्तन आणि नागरिकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवत नीटनेटके राहण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता सुरक्षेसाठी ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य केल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यशैलीत शिस्त आणि तत्परता या दोन्ही गोष्टींना प्राधान्य मिळाले आहे. नागपूर शहरातील प्रमुख चौक, विशेष तपासणी नाके आणि संवेदनशील भागांमध्ये या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सीपींनी शहरातील सर्व डीसीपी, एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही कर्तव्यावर असताना ‘सर्व्हिस गन’ बाळगण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. गेल्या काही महिन्यांत पोलीस दलावर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण पोलीस दलाला कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे केवळ वाहतूक पोलिसांचे मनोधैर्य वाढणार नसून, गुन्हेगारी प्रवृत्तींवरही पोलिसांचा वचक निर्माण होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


