नवी दिल्ली वृत्तसंस्था
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात लाच स्वीकारताना क्लार्कला रंगेहात पकडण्यात आल्याच्या घटनेने राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) यांनी गुरुवारी संध्याकाळी मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर कारवाई करत ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना क्लार्क राजेंद्र ढेरंगे याला अटक केली.
या प्रकरणाची धग थेट मंत्रीस्तरापर्यंत पोहोचली असून संबंधित खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी ‘चौकशीत माझ्यापर्यंत कोणतीही लिंक आढळल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन,’ अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
‘जबाबदारी टाळता येणार नाही’
दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना झिरवळ म्हणाले, “ही जबाबदारी आहेच, नाही म्हणून चालणार नाही. संबंधित कर्मचाऱ्याने जे कृत्य केले आहे, त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. चौकशीत जर या लाच प्रकरणाची कोणतीही लिंक माझ्यापर्यंत जोडली गेली, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन.”
कारवाईनंतर मंत्रालयातील त्यांचे कार्यालय सील करण्यात आल्याच्या चर्चांबाबत विचारले असता, “माझे कार्यालय सील केल्याची माहिती मला माध्यमांकडून मिळत आहे. तसे झाले असल्याचे मला वाटत नाही. मी मुंबईला परतल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेईन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’
झिरवळ यांनी पुढे सांगितले की, “मी मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणावर चर्चा करणार आहे. जो गैरप्रकार घडला आहे, त्याला कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्याला कायदेशीर जबाबदारीला सामोरे जावे लागेल.”
मंत्री कार्यालय आणि संबंधित क्लार्क यांच्यात थेट संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला. “तो कारकून म्हणून बाहेरील कार्यालयात कार्यरत होता. मंत्री, खासगी सचिव किंवा विशेष कार्य अधिकारी यांच्याशी त्याचा थेट संबंध नव्हता,” असे झिरवळ यांनी नमूद केले.
सापळ्यात अटक
दरम्यान, एका तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत औषध दुकानाचा परवाना निलंबित केल्याची कारवाई मागे घेण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार केली होती. पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचला. त्यात ३५ हजार रुपये स्वीकारताना ढेरंगे याला पकडण्यात आले.
एसीबीकडून त्याचे कार्यालय आणि निवासस्थानी झडती सुरू असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. मंत्रालयातील कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि त्याचे राजकीय पडसाद कितपत उमटतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


