नवी दिल्ली वृत्तसंस्था
क्रीडा क्षेत्रात अल्पावधीतच आपली छाप पाडणाऱ्या बिहारमधील वैभव सूर्यवंशी या १४ वर्षीय क्रिकेटपटूला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ (PMRBP) प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनातील दिमाखदार समारंभात हा मानाचा सन्मान वैभवला जाहीर करण्यात आला.
India’s young sporting star shines on the national stage
14-year-old Vaibhav Suryavanshi has been honoured with the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar, presented by hon'ble President Droupadi Murmu, celebrating excellence, dedication and promise.#VaibhavSuryavanshi… pic.twitter.com/C1Ij9v3woX
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 26, 2025
५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या असामान्य कार्यगौरवाला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान सात प्रमुख श्रेणींमध्ये, शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नाविन्यपूर्ण संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा, प्रदान केला जातो. प्रत्येक विजेत्याला पदक, प्रमाणपत्र आणि सन्मान-पुस्तिकेचा समावेश असलेला पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर वैभवची या प्रतिष्ठीत सन्मानासाठी निवड झाली आहे.
अलीकडेच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत पहिल्याच सामन्यात १९० धावांची झळाळती खेळी करीत वैभवने आपली दमदार उपस्थिती नोंदवली होती. मात्र, पुरस्कार समारंभासाठी अनिवार्य उपस्थितीमुळे त्याला पुढील फेरीतील सामन्यांना मुकावे लागले. “दिल्लीत सकाळी सात वाजेपर्यंत रिपोर्टिंग आवश्यक असल्याने तो सध्या संघाबाहेर आहे,” अशी माहिती त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी दिली.
पुरस्कार समारंभानंतर वैभव थेट भारतीय अंडर–१९ संघात सामील होणार आहे. आगामी १५ जानेवारीपासून झिम्बाब्वेत रंगणाऱ्या अंडर–१९ विश्वचषकासाठी भारतीय पथक सज्ज होत असून, त्या मोहिमेत वैभव महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. देशासाठी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार करण्याकडे या बाल पुरस्कार विजेत्याची नजर लागली आहे.


