नवी दिल्ली वृत्तसंस्था
जगातील आघाडीची माहिती-तंत्रज्ञान कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टकडून जानेवारी २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडिया आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांमध्ये रंगू लागल्या आहेत. कंपनी ११ हजार ते २२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणार असल्याच्या अफवांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, या दाव्यांवर मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे स्पष्टीकरण दिले आहे.
ऑनलाइन पोस्ट आणि काही अहवालांनुसार, क्लाउड सेवा, गेमिंग आणि विक्री (सेल्स) विभागांतील कर्मचाऱ्यांवर या कपातीचा परिणाम होऊ शकतो, तर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्राशी संबंधित पदांवरील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील, असा दावा करण्यात आला. विशेषतः मध्यम व्यवस्थापन आणि वरिष्ठ पातळीवरील पदांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.
या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे मुख्य संप्रेषण अधिकारी फ्रँक शॉ यांनी सोशल मिडियावर प्रतिक्रिया देत कर्मचारी कपातीच्या दाव्यांना फेटाळून लावले आहे. सध्या कोणत्याही मोठ्या नोकरकपातीबाबत निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मायक्रोसॉफ्टने गेल्या काही वर्षांत विविध टप्प्यांवर कर्मचारी संख्येत बदल केले आहेत. २०२५ पर्यंत कंपनीने सुमारे १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले होते. जुलै २०२५ मध्येही हजारो कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती, तसेच काही कर्मचाऱ्यांना नवीन प्रकल्पांवर काम देण्यात आले नव्हते.
दरम्यान, मायक्रोसॉफ्टने एआय पायाभूत सुविधांसाठी सुमारे ८० अब्ज डॉलर्सची तरतूद केल्याचे जाहीर केले आहे, जी मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे. त्यामुळे एकीकडे मोठ्या गुंतवणुकीची तयारी आणि दुसरीकडे खर्च नियंत्रणासाठी कर्मचारी कपात, या दोन्ही बाबींबाबत तंत्रज्ञान क्षेत्रात चर्चा सुरू आहे.
तथापि, यंदा जानेवारीत कर्मचारी कपात होणार असल्याच्या चर्चांना सध्या तरी कोणताही अधिकृत आधार नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


