नवी दिल्ली वृत्तसंस्था
पंजाबचे माजी पोलीस महानिरीक्षक (आयजी) अमर सिंग चहल यांनी पटियाला येथे स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर त्यांना तातडीने पटियालातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळावरून १२ पानी सुसाईड नोट सापडली असून त्यात तब्बल ८ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा उल्लेख असल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पथक चहल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. ते जखमी अवस्थेत आढळून आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पटियालाचे पोलिस अधीक्षक पलविंदर सिंग चीमा यांनी सांगितले की, चहल यांच्या काही मित्रांकडून आत्महत्येचा उल्लेख असलेली एक नोट शेअर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. “घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून तिच्या आधारे पुढील तपास करण्यात येईल. नोटमधील मजकुरानुसार योग्य एफआयआर दाखल करून सर्व बाजूंनी चौकशी केली जाईल,” असे चीमा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमर सिंग चहल हे २०१५ मधील फरीदकोट जिल्ह्यातील बेहबल कलान आणि कोटकपुरा गोळीबार प्रकरणातील आरोपी आहेत. या प्रकरणात अतिरिक्त पोलिस महासंचालक एल. के. यादव यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) २४ फेब्रुवारी २०२३ रोजी फरीदकोट न्यायालयात चहल यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
सुसाईड नोटमधील आर्थिक व्यवहारांचा उल्लेख आणि त्यांच्या विरोधातील प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता, ही घटना केवळ आत्महत्येचा प्रयत्न आहे की त्यामागे इतर काही कारणे आहेत, याचा सखोल तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


