पुणे प्रतिनिधी
हुंड्यासारख्या कुप्रथेविरुद्ध कितीही कायदे असले, तरी प्रत्यक्षात त्याचा बळी ठरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. अशीच एक संतापजनक घटना पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, एका २६ वर्षीय विवाहितेवर सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप पतीसह चार जणांवर करण्यात आला आहे.
मरकळ (ता. खेड) येथील आदित्य अनिल लोखंडे (२८), अनिल किसन लोखंडे (५३), सुवर्णा अनिल लोखंडे (४८) आणि समृद्धी अनिल लोखंडे (२५) या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दोन महिन्यांतच छळाची मालिका
तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेचा विवाह २२ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नात वडिलांनी तब्बल २ कोटी रुपये खर्च, ५५ तोळे सोने, २ किलो चांदीची भांडी, विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फॉर्च्युनर गाडी दिली होती. परंतु, इतक्या मानपानानंतरही अवघ्या दोन महिन्यांतच विवाहितेवरील छळ सुरू झाला.
‘वाढदिवस’ कारण सांगून पुन्हा मागणी
पती आदित्यच्या वाढदिवसाचे कारण सांगत सासरीकडून सोन्याचे कडे आणण्याचा आग्रह धरला गेला. विवाहितेच्या वडिलांनी ४ तोळ्यांचे कडे, २५ हजारांचे घड्याळ आणि ३५ हजार रुपये वाढदिवसासाठी दिले. तरीही मागण्यांची मालिका सुरूच राहिली, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
सासऱ्याचा विनयभंग?
तक्रारीमधील सर्वात गंभीर आरोप म्हणजे सासऱ्याने केलेला विनयभंग. पुन्हा-पुन्हा होणाऱ्या मारहाण, शिवीगाळ आणि पैशासाठीच्या दबावाला कंटाळून विवाहितेने अखेर माहेरी आश्रय घेतला आणि पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेनंतर विमानतळ पोलीस ठाण्याने गुन्हा नोंदवून पतीसह सासरच्या चौघांवर विविध कलमांतर्गत तपास सुरू केला आहे. हुंडाबळीविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज या प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.


