पुणे प्रतिनिधी
पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (५५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. राजकीय गुन्हे, गंभीर तपास आणि गुन्हे शाखेतील महत्त्वपूर्ण कारवाईंसाठी ओळखल्या जाणाऱ्या भोसले यांच्या जाण्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे.
गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेले भोसले हे पुणे गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. गुन्हे शाखेत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गाजलेले आणि गुंतागुंतीचे गुन्हे उकलण्यात पोलिसांना यश मिळाले. कोंढवा पोलीस ठाण्यातील त्यांच्या कार्यकाळातही त्यांनी कठोर, काटेकोर आणि परिणामकारक तपासाची छाप सोडली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची बदली पुणे शहरातून छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती. मात्र आरोग्य बिघडल्याचे निदान झाले, त्यानंतर त्यांना पुन्हा पुण्यात गुन्हे शाखेत नियुक्त करण्यात आले. उपचारांसाठी ते मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात दाखल होते.
उपचारादरम्यान गुरुवारी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पुणे पोलिस दलात शोककळ पसरली. सहकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने अमरधाम, हडपसर येथे सायंकाळी पार पडलेल्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला.
कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचा आणि तपासाची अचूक दिशा पकडणारा अधिकारी म्हणून भोसले यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने पुणे पोलिस दलाने एक कार्यतत्पर व अनुभवसंपन्न अधिकारी गमावला आहे.


