पुणे प्रतिनिधी
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४,१८६ परवडणाऱ्या घरांच्या प्रतिक्षित सोडतीसाठी आता उलटी गणती सुरू झाली आहे. तब्बल २ लाख १५ हजारांहून अधिक अर्ज आले असल्याने पडताळणीची प्रक्रिया वेगात सुरू असून १६ किंवा १७ डिसेंबर रोजी सोडत जाहीर करण्याचे संकेत म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.
अर्जांची नोंद ११ सप्टेंबरपासून सुरू झाली होती. नागरिकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देत अंतिम तारीख ३० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली. दरम्यान अर्जदारांकडून ४४६ कोटी रुपये अनामत रक्कम जमा झाली आहे. विक्रमी अर्जसंख्या व विविध आरक्षण श्रेणींची तांत्रिक पडताळणी यामुळे सोडत जाहीर करण्यात उशीर झाल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ११ डिसेंबरला सोडत होणे अपेक्षित होते. मात्र अर्जांची मोठी संख्या व पडताळणीसाठी लागणारा कालावधी लक्षात घेता, प्रक्रिया शनिवारपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर सोडतीची तारीख जाहीर होणार आहे.
दरम्यान, राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यास सोडतीला अडथळा येऊ शकतो. या संदर्भात “नागरिकांच्या हिताची ही महत्त्वाची सोडत असल्याने आवश्यक असल्यास राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ,” असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या हजारो अर्जदारांची प्रतीक्षा आता काहीच दिवसांवर आली असून पुढील आठवडा ‘निर्णायक’ ठरणार आहे.


