मुंबई प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रातील तापमानाचा पारा झपाट्याने घसरवला आहे. अनेक शहरांत किमान तापमान दहा अंशांच्या खाली गेले असून हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड आणि परभणी येथे ५.९ अंश, तर जेऊर येथे ६ अंशांपर्यंत पारा खाली आला. राज्याच्या विविध भागांमध्ये एकाच रात्रीत पडलेल्या या तापमानातील मोठ्या घसरणीमुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली.
थंडीची लाट तीव्र, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
किमान तापमान दहा अंशांखाली जाणे आणि सरासरी तापमानापेक्षा तब्बल ४.५ अंशांनी घट होणे. या दोन निकषांनुसार हवामान विभागाने धुळे, निफाड, परभणी, जेऊर, गोंदिया, यवतमाळ या भागांमध्ये थंडीची लाट जाणवल्याचे स्पष्ट केले आहे.
आजचा दिवसही राज्यासाठी गारठा वाढवणारा ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर यांसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ शहरांत नोंदलेले किमान तापमान
* धुळे: ५.४°C
* अहिल्यानगर: ७.४°C
* गोंदिया: ८.६°C
* जळगाव: ८.४°C
* नागपूर: ८.८°C
* पुणे: ८.९°C
* नाशिक: ९.३°C
* यवतमाळ: ९.२°C
* मालेगाव: ९.२°C
* अमरावती: १०.६°C
* अकोला: १०.६°C
* सातारा: ११.२°C
* छत्रपती संभाजीनगर: ११°C
* परभणी: ११°C
* महाबळेश्वर: १२°C
* सांगली: १३.२°C
* सोलापूर: १३.४°C
थंडी वाढणारच!
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तरेकडील हिमवाऱ्यांचा वेग कायम राहिल्याने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस कडाक्याची थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे लहान मुले, वृद्ध आणि व्याधिग्रस्त नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरात गारठ्याने घट्ट पकड घेत असताना, नागरिकांना ‘थंडीची सकाळ’ आणि ‘धुरकट संध्याकाळ’ अशी हवामानाची लय अनुभवावी लागणार आहे.


