मुंबई प्रतिनिधी
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याच्या तासभर आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई व ठाणेकरांसाठी महत्त्वाकांक्षी विकास घोषणांची मालिकाच जाहीर केली. मुंबईतील ऐतिहासिक महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर एकत्रित २९५ एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावित प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सोमवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला.
या वेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, सुप्रसिद्ध वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. मुंबईकरांसाठी हे आजवरचे सर्वांत मोठे ‘ग्रीन गिफ्ट’ ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. सेंट्रल पार्कमध्ये कोणतेही पृष्ठभागावरील काँक्रिट बांधकाम नसेल. रेसकोर्सचा ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवत, संपूर्ण परिसर पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
१२५ एकर रेसकोर्स, १७० एकर कोस्टल रोड – भव्य सेंट्रल पार्क
महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२५ एकर आणि कोस्टल रोडच्या १७० एकर जागेवर मिळून एकूण २९५ एकरांचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. या पार्कखाली सुमारे १० लाख चौरस फुटांचे अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित केले जाणार असून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होतील. यामध्ये कबड्डी, खो-खो यांसारख्या मराठमोळ्या खेळांसाठी स्वतंत्र सुविधा असतील. सेंट्रल पार्कमध्ये फिरताना नागरिकांना अश्वशर्यती पाहण्याचाही अनुभव मिळणार आहे.
कोस्टल रोडशी १२०० मीटर भूमिगत जोड
वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने सेंट्रल पार्क १२०० मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. यासाठी ५५० कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून, संपूर्ण डिझाइन हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी साकारले आहे. पार्कच्या भूपृष्ठावर पदपथ वगळता कोणतेही बांधकाम नसेल; संपूर्ण परिसर उद्यान म्हणून खुला राहील.
या प्रकल्पामुळे मुंबईत सुमारे ३०० एकरांचे ‘ऑक्सिजन पार्क’ तयार होणार असून, हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा दावा शिंदे यांनी केला. मे महिन्यापर्यंत मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण होईल, तसेच ६ डिसेंबर २०२६ पर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणेकरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची विकासकामे
ठाणे खाडीकिनारी ५० एकर क्षेत्रात भारतातील सर्वांत उंच, २६० मीटर उंचीचा व्ह्यूइंग टॉवर उभारण्यात येणार आहे. फ्रान्समधील आयफेल टॉवरची उंची ३०० मीटर असल्याची आठवण करून देत, हा प्रकल्प ठाण्याच्या ओळखीला नवे परिमाण देईल, असे शिंदे म्हणाले.
याशिवाय कासारवडवली येथे कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथे २५ एकरांचे टाउन पार्क, आगरी-कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क, ॲडव्हेंचर पार्क, १२.५ एकरांचे पक्षी संग्रहालय, २५ एकरांचे म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि ५० एकरांचे अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. तसेच ठाणे महापालिकेकडून मीरा–भाईंदर सीमेपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत १८.४ किमी लांबीचा ‘आनंदवन’ हरित पट्टा विकसित केला जाणार आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळतील, नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि ठाण्याचा विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.


