सिन्नर, प्रतिनिधी
राज्याच्या महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. सिन्नर तालुक्यातील नायब तहसीलदार संजय भिकाजी धनगर (वय ५१, रा. के. पी. मार्केट समोर, नाशिक) यांना तब्बल २ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (१० डिसेंबर) अटक केली.
दोडी खुर्द (ता. सिन्नर) येथील गट क्र. ४९९ मधील तब्बल ६० आर जमीन तक्रारदाराच्या मुलगा-सुनेने खरेदी केली होती. या व्यवहाराशी संबंधित फेरफार नोंद (क्र. ३३४५) रद्द करण्यासाठी दिलेल्या तक्रारीचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने लावून ती नोंद मंजूर करण्यासाठी धनगर यांनी १० लाखांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम २.५ लाखांवर आली.
तक्रारदाराने तत्काळ ACB नाशिक कार्यालयाशी संपर्क साधला. पथकाने शहानिशा करून मंगळवारी (९ डिसेंबर) सापळा लावला. नाशिकमधील सोपान हॉस्पिटलसमोर रोडकडेला तक्रारदाराकडून लाच घेताना धनगर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच स्वीकारताना पकडल्या गेलेल्या धनगर हे सिन्नर येथे वर्ग २ चे महसूल अधिकारी असून, त्यांच्या कारभारावरील अनेक प्रश्नचिन्हांना या कारवाईमुळे आणखी बळ मिळाले आहे.


