लोणी काळभोर प्रतिनिधी
यवत पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी निखिल कैलास रणदिवे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या कथित त्रासाला कंटाळून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. स्वतःच्याच फोटोवर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ लिहित, भावनिक सुसाईड नोट सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर रणदिवे अचानक गायब झाले. त्यांच्या मोबाईलचा संपर्कही तुटल्यानंतर कुटुंबीयांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे.
निखिल रणदिवे यांचे बंधू अक्षय रणदिवे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. “जर एका पोलीस कर्मचाऱ्यालाच वरिष्ठांच्या त्रासामुळे आत्महत्येचा विचार करावा लागत असेल, तर हे पोलीस दलासाठी मोठे दुर्दैव आहे,” असे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
“देशमुखांच्या त्रासाला कंटाळलो आहे” सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप
सुसाईड नोटमध्ये रणदिवे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
त्यांनी लिहिले आहे की
“गेल्या एक वर्षापासून देशमुख मला सतत त्रास देत आहेत.”
“सुट्ट्या बंद, अर्वाच्च भाषा, तासन्तास उभे करणे, सतत बाहेरगावी ड्युटी…”
“कुटुंबासाठी वेळ मिळत नाही; माझ्या मृत्यूस देशमुख जबाबदार.”
या पोस्टसोबत निखिल यांनी आपल्या लहान मुलीला वाढदिवसाच्या भावनिक शुभेच्छाही लिहिल्या.
“दिदी, हा तुझा पहिला आणि माझ्याकडून शेवटचा वाढदिवस.”
या ओळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
देशमुखांविरोधात कर्मचाऱ्यांत नाराजी, पण कारवाई शून्य?
यवत पोलीस ठाण्यात देशमुख यांच्या कार्यशैलीबद्दल नाराजीचे सावट आहे. कर्मचारी आणि कनिष्ठ अधिकार्यांनी त्यांच्यावर खालील आरोप केल्याचे समजते
• महिला कर्मचारी व अधिकार्यांनाही अर्वाच्च भाषेत धारेवर धरणे
• वरिष्ठांचे आदेश पायदळी तुडवणे
• तीन आठवड्यांपासून अनधिकृतरीत्या सुट्ट्या बंद
• कर्मचाऱ्यांचे खोटे रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठवणे
• अवैध धंद्यांना पाठबळ असल्याची चर्चा
गुटखा तपासात अडकलेल्या व्यावसायिकाला मदत म्हणून रणदिवे यांना बदली करणे
दरम्यान, या तक्रारींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी वाढत आहे. “देशमुख यांना वाचवणारा नेमका कोण?” हा प्रश्न पोलीस दलात पडद्यामागे चर्चिला जात आहे.
पूर्वीच्या ठिकाणीही वाद, इस्लामपूर, मिरज आणि यवत येथे दंगली
देशमुख यांच्या कार्यकाळात इस्लामपूर, मिरज आणि यवत येथे दंगली घडल्या होत्या.
या घटनांमध्ये शेकडो आरोपी असताना केवळ १८ अटक करण्यात आल्याने वरिष्ठांनीही नाराजी व्यक्त केली होती.
कुटुंबीयांचे संतप्त विधान
निखिल रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली
“माझे पती दीर्घकाळ मानसिक तणावाखाली होते. वर्षभरापूर्वी बदली झाली असतानाही त्यांना यवत ठाण्यातून मुक्त केले गेले नाही. बाहेरगावी कर्तव्य करून परतले की पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात होते. या त्रासाला कंटाळून ते गायब झाले. ते सापडेपर्यंत मी ठाण्याबाहेरून जाणार नाही.”
पोलीस प्रशासनाची प्राथमिक प्रतिक्रिया
उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांनी माहिती देताना सांगितले
“निखिल रणदिवे यांच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. त्यांनी व्हॉट्सअॅपवर केलेल्या आरोपांची स्वतंत्र तपासणी केली जाईल.”
बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याच्या शोधाचा तपास गतिमान करण्याची मागणी
निखिल रणदिवे सापडत नसल्याने स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि पोलीस दलातील काही ज्येष्ठ कर्मचारी तपास गतिमान करण्याची मागणी करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


