दौंड प्रतिनिधी
व्हॉट्सअॅप स्टेटसवर आत्महत्येचा संदर्भ असलेला भावनिक संदेश आणि लहान मुलीचा फोटो पोस्ट करत अचानक बेपत्ता झालेल्या पोलिस नाईक निखिल रणदिवे यांच्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. तब्बल पाच दिवसांच्या शोधानंतर रणदिवे मध्यरात्री घरी परतले असून त्यांनी कोणतेही अतिरेकी पाऊल न उचलल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलासह कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
यवत पोलिस ठाण्याअंतर्गत केडगाव पोलीस चौकीत कार्यरत असलेले रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वागणुकीबाबत गंभीर आरोप करणारा संदेश स्टेटसवर पोस्ट केला होता. गेल्या वर्षभरापासून सततचा मानसिक छळ, मनमानी आदेश, आजारी मुलीला वेळ न मिळणे, वारंवार दूरस्थ ठिकाणी ड्युटी आणि नुकत्याच झालेल्या बदली प्रक्रियेत झालेला विलंब, या सर्व कारणांमुळे ते प्रचंड तणावाखाली असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
स्टेटस पोस्ट केल्यानंतर रणदिवे यांचा मोबाईल बंद झाला आणि ते बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर यवत, शिक्रापूर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या मोठी शोधमोहीम राबवली. अखेर पाच दिवसांनी रणदिवे घरी परतल्याची माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, रणदिवे यांनी केलेल्या आरोपांवर आता स्वतंत्र चौकशीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पीआय नारायण देशमुख यांच्याविरोधात यापूर्वीही काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या प्रकरणात विभागीय तपास सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
तेजवानी–येवले समोरासमोर
मुंढवा येथील कोट्यवधींच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातही पुण्यात महत्त्वाची चौकशी पार पडली. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांची बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. या दरम्यान, अटकेत असलेली शीतल तेजवानी आणि येवले यांची समोरासमोर चौकशीही झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार संचालक असलेली अमेडिया कंपनी, संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, सूर्यकांत येवले आणि हेमंत गवंडे यांच्यावर या प्रकरणी गुन्हा नोंद असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून वेगाने सुरू आहे.
पुढील कारवाई काय होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


