मुंबई प्रतिनिधी
पालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याचा थेट परिणाम मुंबईतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण प्रकल्पांवर झाला आहे. अंधेरी पश्चिम ते मंडाले–मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन हा टप्पा पूर्ण होऊनही त्याचे लोकार्पण लांबणीवर पडले असून, नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ८६४ कुटुंबांचे नव्या घरात स्थलांतराचे स्वप्नही तूर्तास अपूर्ण राहिले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) राबवण्यात येणाऱ्या मेट्रो २ ब प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहे. यातील मंडाले ते डायमंड गार्डन हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, या मार्गिकेसाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्रही एमएमआरडीएला प्राप्त झाले आहे. ऑक्टोबर महिन्यातच हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र, त्या वेळी सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने लोकार्पण रखडले. त्यानंतर दीड महिन्यांहून अधिक काळ उलटूनही प्रत्यक्षात सेवा सुरू होऊ शकली नाही.
आता पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने या मेट्रो टप्प्याचे लोकार्पण आणखी पुढे ढकलले गेले आहे. परिणामी, मंडाले ते डायमंड गार्डनदरम्यान मेट्रोने प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना थेट फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच या मार्गिकेचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव प्रकल्पातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकल्पातील पाच पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण झाले असून, त्यामधील ८६४ घरांना निवासी दाखलाही मिळाला आहे. प्रत्येकी ५०० चौ. फुटांचे प्रशस्त घर मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या रहिवाशांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरायला मात्र अजून वेळ लागणार आहे.
या घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम नोव्हेंबर महिन्यात नियोजित होता. मात्र, तो कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. त्यानंतर चावी वाटपाबाबत कोणतीही ठोस घोषणा झाली नाही. आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा कार्यक्रम फेब्रुवारी २०२६ मध्ये किंवा त्यानंतरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे चाळीत राहणाऱ्या ८६४ कुटुंबांना नव्या घरात प्रवेशासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
याशिवाय, म्हाडा मुंबई मंडळाने पालिका निवडणुकीपूर्वी मुंबईतील १२५ घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने ही योजनाही अडकली आहे. सोडतीशिवाय घरांची विक्री तसेच मुंबईतील घरांसाठीची पुढील सोडत आता मार्च–एप्रिल २०२६ मध्येच होण्याची शक्यता आहे.
एकूणच, आचारसंहितेमुळे मुंबईतील महत्त्वाचे मेट्रो प्रकल्प, पुनर्विकासातून मिळणारी घरे आणि गृहनिर्माण योजनांचे टप्पे एकाच वेळी रखडले असून, त्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.


