मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी थेट हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांची कॉलर पकडून वर्दी फाडण्यात आल्याचा प्रकार घडला असून, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कांदिवलीमध्ये पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली पश्चिम एकता नगरमध्ये, मारामारीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी हल्ला केला.#Crimenews #Mumbainews #police #kandiwali pic.twitter.com/C3xn2MZc7s
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) December 15, 2025
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेतील एकता नगर परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जमावाने पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावरच हल्ला चढवला. काही जणांनी पोलिसांशी हुज्जत घालत थेट हात उचलल्याचे व्हिडिओत दिसून येते.
व्हायरल झालेल्या चित्रफितीत आरोपी पोलिसांना अडवताना, वाद घालताना आणि कॉलर पकडून वर्दी ओढताना स्पष्टपणे दिसत आहेत. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर अशा प्रकारचा हल्ला होणे गंभीर बाब असून, गुंडांना पोलिसांचा धाक उरलेला नाही, हे या घटनेतून अधोरेखित होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
घटनेनंतर कांदिवली पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. परिसरात तातडीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, अतिरिक्त पोलीस दल पाचारण करून एकता नगर आणि आसपासच्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपींसह संबंधित गुंडांवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे


