जुन्नर प्रतिनिधी
वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे शनिवारी (दि. १३) आणि रविवारी (दि. १४) श्रीशंभू महादेव यात्रोत्सवानिमित्त ‘शंभू महादेव केसरी’ निमंत्रित २०-२० बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीशंभू महादेव प्रतिष्ठानच्या वतीने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी सरपंच रामदास पवार यांनी दिली.
या शर्यतीतील प्रथम क्रमांकात येणाऱ्या गाड्यास १ लाख ११ हजार १११ रुपये विभागून, तसेच फळीफोड गाड्यास १५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकास १ लाख १ हजार १११ रुपये विभागून व फळीफोड गाड्यास १० हजार रुपये बक्षीस मिळेल. अंतिम फेरीसाठी (फायनल) एक ते दहा क्रमांक काढून ३ लाख रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात येणार आहे.
यात्रेचे विशेष बक्षीस म्हणून दोन दिवसांत सर्वात कमी सेकंदात येणाऱ्या, म्हणजेच ‘घाटाचा राजा’ ठरणाऱ्या गाड्यास ‘शंभू महादेव केसरी’ सन्मान देऊन एक बुलेट दुचाकी आणि चार बैलांना प्रत्येकी एक ढाल व दोन आकर्षक चषक देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. पंचक्रोशीतील शौकिनांनी या शर्यतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


