
बीड:प्रतिनिधी
धनंजय मुंडेंचा निकवटर्तीय वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावं, यासह विविध मागण्यासाठी मस्साजोगचे गावकरी आक्रमक झाले आहेत. गावकरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत आहेत. तर पोलिसांना थकवा देत धनंजय देशमुख ही पाण्याच्या टाकीवर चढले आहे.
गावात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असून मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील गावात दाखल झाले आहेत.
गावात दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना फोन लावला आणि टाकीवरुन खाली येण्याचं विनवणी केली. ”तुम्ही खाली या, तुमची गरज आहे आम्हाला. सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही खाली या, माझी विनंती आहे. तुम्हाला काय झालं तर त्यांचं जगणं अवघड करेन.” असं मनोज जरांगे म्हणाले.
मस्साजोगमध्ये गावकरी मोठ्या संख्येने टॉवर परिसरामध्ये दाखल झाले आहेत. एक महिना लोटला तरी या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झालेले नाहीत. मुख्य सुत्रधारावर खुनाचा गुन्हा दाखल नाही. कराडवर खुनासह मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
यासह या प्रकरणाची केस उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावी, हीदेखील मागणी आहे. सरकारने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या आंदोलनात गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे.