
अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व भाग आणि बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाने अक्षरशः तडाखा दिला. ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक गावे पाण्याच्या विळख्यात सापडली. करंजी, जवखेडे, तिसगाव आणि मढी या गावांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये शिरले, तर पुलांवरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.
पाथर्डी तालुक्यातील जगसून तांडा येथे एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. करंजी व जवखेडे या गावांतील सुमारे ७० ते ८० नागरिक पाण्यात अडकले होते. त्यापैकी १६ ग्रामस्थांची सुटका आपत्ती निवारण पथक व स्थानिकांच्या मदतीने करण्यात आली. पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाची टीम करंजीत दाखल होऊन बचाव कार्यात सहभागी झाली. प्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिरालाही पुराचा वेढा बसला असून, अनेक वर्षांनंतर इतकी गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.
अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावरील सारोळाबद्धी परिसरातील तात्पुरता पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. नगर-जामखेड मार्गावरही पुलावरून पाणी वाहत असल्याने गाड्या अडकून पडल्या.
शेजारील बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील कडा येथे परिस्थिती गंभीर बनली आहे. कडी नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांनी इमारतींवर चढून मदतीची हाक दिली. जिल्हा प्रशासनाने लष्कराला पाचारण केले असून, हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य सुरू आहे. आमदार सुरेश धस हे स्वतः कडा गावात दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
दरम्यान, दुपारनंतर पावसाला उघडीप मिळाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. तथापि, शेती व जनावरांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. आपत्ती निवारण पथक, स्थानिक प्रशासन व लष्कराच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.