मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या प्रशासनात महत्त्वाचा बदल करत नव्याने नियुक्त झालेले मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पदभार स्वीकारला. मंत्रालयात झालेल्या छोटेखानी सोहळ्यात मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांनी त्यांना पदभार सोपवला. “महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी, पारदर्शक आणि परिणामकारक कामकाज करण्याचा प्रयत्न राहील,” असा विश्वास अग्रवाल यांनी या वेळी व्यक्त केला.
केंद्र शासनातील प्रतिनियुक्तीवरून परत आलेल्या अग्रवाल यांची राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. राज्याचे ४७ वे मुख्य सचिव म्हणून त्यांनी आज कार्यभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळाची मुदत एक वर्षाची असून याच कालावधीत निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, इक्बालसिंग चहल, भूषण गगराणी, दीपक कपूर, अनिल डिग्गीकर आणि ओ. पी. गुप्ता, मुख्य सचिवपदाची संधी गमवावी लागली आहे.
मुख्य सचिवपदाच्या निवडीबाबत गेल्या काही महिन्यांत प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. सर्वात ज्येष्ठ असलेल्या चहल यांना पद देण्याऐवजी मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांना प्रथम तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आणि त्यानंतर प्रतिनियुक्तीवरून अग्रवाल यांना परत बोलावण्यात आले. आज पदभार स्वीकारताना सनदी सेवेतले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य प्रशासनातील पुढील दिशादर्शक निर्णयांवर अग्रवाल यांच्या कार्यशैलीची छाप उमटणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


