मुंबई प्रतिनिधी
राज्यातील तळीरामांसाठी मोठीच कडू बातमी. १ डिसेंबरपासून पुढील तीन दिवस काही निवडक शहरांमध्ये मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ड्राय डे लागू करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतमोजणीच्या दिवसापर्यंत संबंधित मतदारसंघांमध्ये दारू विक्रीबंदी अनिवार्य असते.
त्यामुळे १ ते ३ डिसेंबरदरम्यान संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांतील सर्व प्रकारचे मद्यविक्री परवाने, देशी-विदेशी किरकोळ विक्री, वाईन शॉप, बिअर शॉपी, बार-अँड-रेस्टॉरंट आदी, बंद राहणार आहेत.
काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण तीन दिवस विक्रीबंदी राहणार असून, काही ठिकाणी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच विक्रीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी विक्रीबंदीचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र या निर्णयाचा फटका तळीरामांना मोठ्या प्रमाणावर बसणार हे निश्चित.


