मुंबई प्रतिनिधी
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध वाहतूक व्यवस्थांची कसरत करावी लागत असल्याची अनुभूती अनेकांना असते. मात्र, आता ही गैरसोय भूतकाळात जमा होणार आहे. कारण देशात प्रथमच असे आधुनिक आणि उंच रेल्वे स्थानक उभे राहणार आहे, जे बस, मेट्रो आणि बुलेट ट्रेन, सर्व कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे.
अहमदाबादमध्ये उभारली जात असलेली ही भव्य सुविधा तब्बल 16 मजली उंचीची असून, ती भारतातील सर्वाधिक उंच रेल्वे स्टेशन म्हणून ओळखली जाणार आहे. या स्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू असून 2027 पर्यंत प्रवाशांसाठी खुले करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे.
सुविधा लंडन–पॅरिसच्या तोडीस तोड
भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा हा नवा अध्याय मानला जात आहे. जगातील नामांकित शहरांतील अत्याधुनिक स्थानकांना टक्कर देईल अशा स्वरूपात या स्टेशनची उभारणी केली जात आहे.
विशाल पार्किंग, व्यावसायिक संकुले, कार्यालयीन जागा आणि प्रवाशांसाठी वर्ल्ड-क्लास सुविधा, अशा सर्व बाबींचा स्टेशनमध्ये समावेश असेल.
सर्व वाहतूक व्यवस्थांचा एकाच ठिकाणी संगम
हे स्टेशन देशातील पहिले असे मॉडेल ठरणार आहे, जिथे
• रेल्वे
• मेट्रो
• बस सेवा
• बुलेट ट्रेन
या चारही महत्त्वाच्या वाहतूक व्यवस्था एकाच परिसरात उपलब्ध राहतील. प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या वाहतुकीकडे सहजतेने वळता येईल, त्यामुळे प्रवास अधिक जलद, सुकर आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे.
अर्थव्यवस्था आणि प्रवासाला नवीन गती
या स्थानकामुळे उद्योग, पर्यटन, व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहमदाबादमधून ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हे स्टेशन ‘वन-स्टॉप ट्रान्झिट हब’ ठरणार आहे.
2027 मध्ये सेवेत येणारे हे स्टेशन देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, यात शंका नाही.


