
बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्याकांडानंतर गोंधळ आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मानल्या गेलेल्या वाल्मिक (अण्णा) कराडच्या नावाने एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याने नवा वाद पेटला आहे. तुरुंगात असलेल्या कराडच्या समर्थनार्थ निधी गोळा करण्याचे आवाहन या बॅनरमधून करण्यात आले आहे.
“फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा. तेव्हाच आण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील,” अशा मजकुरासोबत कराडचा फोटो आणि ‘फोन पे’चा स्कॅनर लावलेला हा बॅनर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. यातील स्कॅनर एका संदीप गोरख तांदळे यांच्या नावाने नोंदवलेल्या खात्याशी जोडलेला असल्याचे समोर आले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती. त्यानंतर बीडसह राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या खटल्यात वाल्मिक कराडचे नाव प्रमुख सूत्रधार म्हणून चर्चेत आले. प्रकरण सध्या न्यायालयात असून कराड तुरुंगात आहे. अशा आरोपीच्या समर्थनासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न सार्वजनिक पातळीवर सुरू झाल्याने प्रशासन व कायदा यंत्रणेसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
संदीप तांदळे हे नाव याआधीही चर्चेत आले आहे. आमदार सुरेश धस, जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना खुलेआम धमक्या दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एवढेच नव्हे, तर याच नावाने पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यातही निधी गोळा करण्याचे बॅनर व्हायरल झाले होते. त्यावर देखील कराडचा फोटो झळकत होता.
सध्या व्हायरल होत असलेल्या या नव्या बॅनरमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गुन्हेगारी व खंडणी प्रकरणात अडकलेल्या आरोपींचे खुलेआम समर्थन करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.