मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील आरे कॉलनीतील रॉयल पाम्स इस्टेटमधील एका बंगल्यात झालेल्या घरफोडीचा गुन्हा केवळ १२ तासांत उघडकीस आणत आरे पोलिसांनी सऱ्हाईत बाप-लेक चोरट्यांच्या टोळीला गजाआड केलं आहे. पोलिसांनी या दोघांकडून तब्बल ₹४७.६५ लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, पितळी मूर्ती आणि इतर मौल्यवान वस्तू हस्तगत केल्या आहेत.
आरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाराजम गंगाराम वुटनुरी (५९) यांच्या मालकीच्या बंगल्यातील काच फोडून अज्ञात व्यक्तींनी घरफोडी केली होती. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.
गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील ३५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत संशयित नियामतुल्ला आयुब खान उर्फ जुली (३८) आणि त्याचा मुलगा शाहीद नियामतुल्ला खान (१९) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश अंधारे, पो.ह.क. नागरे, पो.ह.क. गणेश पाटील, पो.ना.क. महाले आणि पो.शि.क. बरकडे यांच्या पथकाने केली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अप्पर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, परिमंडळ-१२ चे उपायुक्त महेश चिमटे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.
अवघ्या काही तासांत उघडकीस आलेल्या या गुन्ह्याने मुंबई पोलिसांची चपळाई आणि तांत्रिक तपास कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


