मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच लोकशाही उत्सवाला गालबोट लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दादर परिसरात, मतदानाच्या पहिल्याच तासात दुबार मतदार आढळल्याने एकच खळबळ उडाली. बोगस मतदानाबाबत व्यक्त होत असलेल्या भीतीला या घटनेने दुजोरा दिल्याने निवडणूक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच वॉर्ड क्रमांक १९२ मधील एका मतदान केंद्रावर एका महिला मतदाराचे नाव मतदारयादीत दोन वेळा नोंद असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार निदर्शनास येताच मतदान केंद्रावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला गोंधळाचे वातावरण होते, तर काही काळासाठी मतदान प्रक्रियाही थांबवण्यात आली.
राज्यभर सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आहे. ठाकरे बंधूंनी दुबार मतदारांबाबत आक्रमक भूमिका घेतली असून, अशा मतदारांना तात्काळ रोखण्याचे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. अशा परिस्थितीत, थेट दादरमध्ये, ठाकरेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात, दुबार मतदाराचा प्रकार उघडकीस येणे, राजकीयदृष्ट्या अधिकच संवेदनशील मानले जात आहे.
नेमकं काय घडलं?
वॉर्ड क्रमांक १९२ मधून मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. त्याच वेळी एका महिला मतदार मतदानासाठी पुढे आली असता तिचे नाव मतदारयादीत दोन वेळा असल्याचे निवडणूक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. हा प्रकार समजताच संबंधित महिला मतदाराला तात्काळ मतदानापासून थांबवण्यात आले.
यानंतर आधार कार्डच्या आधारे तिची ओळख पटवण्यात आली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तिच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले असून, योग्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तिला मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी निवडणूक यंत्रणेवर जोरदार टीका केली. “मतदारयादीतील अशा गंभीर त्रुटींमुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. दुबार नावे असणं ही निवडणूक आयोगाची मोठी चूक आहे,” असा आरोप त्यांनी केला.
थेट लढतीमुळे वाढले महत्त्व
वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रीती पाटणकर यांच्यात थेट लढत होत आहे. या प्रभागात शिवसेना भवनचा समावेश असल्याने हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे येथील प्रत्येक घडामोडीकडे राज्यभरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
मतदारयादीतील घोळ, नावे वगळल्याच्या तक्रारी आणि आता दुबार मतदाराचा प्रकार, या सगळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले असून, पुढील काही तासांत आणखी कोणते प्रकार समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


