मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोठी कारवाई करत राज्यभरातील एकूण १०७ परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द केली आहे. यामध्ये दहावीची ३१ तर बारावीची ७६ केंद्रे समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक केंद्रांवर कारवाई झाल्याचे समोर आले आहे.
कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणी
परीक्षांतील शिस्त, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा सुनिश्चित करण्यासाठी राज्य मंडळाने गेल्या वर्षापासून कॉपीमुक्त अभियान अधिक तीव्र केले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांची तपासणी, भरारी पथकांच्या अचानक भेटी, जिल्हास्तरीय निरीक्षण, ड्रोनद्वारे नजर, पोलीस बंदोबस्त तसेच परीक्षा केंद्राबाहेर दृकश्राव्य चित्रीकरण अशा उपाययोजना राबवण्यात येतात. भरारी पथकांकडून गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते.
दहावी: ३१ केंद्रांची मान्यता रद्द
फेब्रुवारी-मार्च २०२५ मधील दहावीच्या परीक्षेदरम्यान राज्यातील ३४ केंद्रांवर गैरप्रकार आढळले. तपासणीनंतर ३१ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली. विभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
पुणे: ७
नागपूर: ६
छत्रपती संभाजीनगर: १०
मुंबई: १
लातूर: ७
दरम्यान, कोकण, नाशिक, कोल्हापूर आणि अमरावती विभागातील कोणतेही दहावीचे केंद्र रद्द करण्यात आलेले नाही.
बारावी: ७६ केंद्रांवर कारवाई
बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षांमध्ये ११२ केंद्रांवर गैरप्रकार नोंदवले गेले होते. त्यापैकी ७६ केंद्रांची मान्यता यंदा रद्द करण्यात आली. विभागनिहाय स्थिती अशी
पुणे: १२
नागपूर: ११
छत्रपती संभाजीनगर: २८
मुंबई: ५
लातूर: ८
अमरावती: ६
नाशिक: ६
या यादीत कोकण व कोल्हापूर विभागातील कोणतेही बारावीचे केंद्र समाविष्ट नाही.
मंडळाचे स्पष्टीकरण
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, परीक्षेदरम्यान भरारी पथकांनी गैरप्रकार पकडल्यास संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. “या कठोर कारवाईमागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करणे, परीक्षांची विश्वासार्हता वाढवणे आणि शिक्षणव्यवस्थेत शिस्त व प्रामाणिकपणा प्रस्थापित करणे हा आहे,” असे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे पुढील परीक्षांमध्ये केंद्रांची जबाबदारी वाढणार असून, गैरप्रकारांविरोधात शून्य सहनशीलतेचा संदेश स्पष्टपणे दिला गेला आहे.


