स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ६ च्या पथकाने पालघर जिल्ह्यातील पेल्हार, नालासोपारा परिसरात मेफेड्रोन (एम.डी.) उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर मोठी धाड टाकत तब्बल ₹१३.४४ कोटींचा अंमली पदार्थ आणि कच्चा माल जप्त केला आहे. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली असून, तपास सुरू आहे.
ही कारवाई टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ४६२/२०२५, कलम ८(क), २२(क), २९ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विक्रीपासून कारखान्यापर्यंतचा धागा उलगडला
दिनांक ५ ऑक्टोबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली होती की एक इसम एम.डी. विक्रीसाठी येणार आहे. सापळा रचून त्याला पकडले असता त्याच्याकडे ५७.८४ ग्रॅम एम.डी. सापडला. पुढील तपासात या इसमासह आणखी चार जणांना मुंबई आणि मिरा रोड परिसरातून अटक करण्यात आली.
चौकशीतून उघड झाले की ही टोळी नालासोपारा (पूर्व) येथील रशीद कंपाऊंड, खैरपाडा, भावखळ परिसरात एम.डी. निर्मिती करणारा कारखाना चालवत होती. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ६ किलो ६७५ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) तसेच उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, केमिकल्स आणि प्लॅन्ट साहित्य जप्त केले. जप्तीची एकूण किंमत ₹१३,३८,५३,७००/- एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक आरोपींची नावे
सोहेल अब्दुल रौफ खान (३६, घाटकोपर पश्चिम), मेहताब शेरअली खान (२९, गोवंडी), इकबाल बिलाल शेख (३३, गोवंडी), मोहसीन कययुम सय्यद (४०, गोवंडी) आणि आयुबअली आबुबकर सिध्दीकी (२३, पनवेल) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाची भूमिका
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहाय्यक पोलीस आयुक्त (का. व सु.) सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील, आणि पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ६) समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईचे नेतृत्व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा कुलकर्णी यांनी केले.
या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे, सपोनि. मैत्रानंद खंदारे, सपोनि. विलास पवार, पोउनि. विजयसिंह देशमुख, सपोनि. सुशांत साळवी, पोउनि. अजय गोल्हार, तसेच पोह. राणे, आखाडे, भिलारे, सावंत, उपाध्यय, दिवटे, पोशि. पुंजारी, केदार, भिसे, झिणे, राउत, सानप, नागरगोजे, काटकर आणि काशिद यांनी कौशल्यपूर्ण तपास आणि कारवाईत सहभाग घेतला.
मुंबई पोलिसांच्या या धाडसी आणि योजनाबद्ध कारवाईमुळे नालासोपारा परिसरातील अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, आणखी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


