उदयपूर :
महाराणा प्रताप यांचे वंशज असलेल्या उदयपूरच्या ऐतिहासिक मेवाड राजघराण्यात तब्बल १० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून वारसाहक्काचा वाद उफाळून आला आहे. माजी राजपरिवारप्रमुख महाराणा अरविंदसिंह मेवाड यांच्या मृत्यूपत्रावरून त्यांच्या मुलगा लक्ष्यराजसिंह मेवाड आणि दोन मुली पद्मजा कुमारी व भार्गवी यांच्यात न्यायालयीन संघर्ष सुरू झाला आहे.
अरविंदसिंह मेवाड यांचे १६ मार्च २०२५ रोजी निधन झाले. त्यापूर्वी सुमारे महिनाभर आधी त्यांनी मृत्यूपत्र करून आपली बहुतेक स्वकमाईची मालमत्ता मुलगा लक्ष्यराजसिंह यांच्या नावावर केली होती. मात्र, या मृत्यूपत्राची वैधता आव्हानात टाकत मुलींनी न्यायालयात धाव घेतली आहे. वडील त्या काळात मद्यपानाच्या आहारी होते व निर्णय घेण्याच्या मानसिक स्थितीत नव्हते, असा दावा त्यांनी केला आहे.
मेवाड राजघराण्याच्या वारसामध्ये एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्समधील हिस्सेदारीचा समावेश असून, या समूहाकडून राजस्थानमध्ये सुमारे ६०० खोल्यांची आलिशान हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालवले जातात. शिव निवास पॅलेस, जगमंदिर आयलँड पॅलेस यांसारख्या ऐतिहासिक राजवाड्यांचा त्यात समावेश आहे. या मालमत्तांची एकूण किंमत अंदाजे १० हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.
उदयपूरच्या सिटी पॅलेस परिसरातील खासगी मालमत्ता, हॉटेल व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि निर्णयाधिकार हे लक्ष्यराजसिंह यांच्याकडे राहतील, असे मृत्यूपत्रात नमूद करण्यात आले आहे. याच आधारे लक्ष्यराजसिंह यांनी स्वतःला संपत्तीचा कायदेशीर उत्तराधिकारी घोषित करत राजस्थान उच्च न्यायालयात ‘लेटर्स ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन’साठी अर्ज दाखल केला.
याला विरोध करत पद्मजा कुमारी व भार्गवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे की, मृत्यूपत्रात ‘स्वकमाईची’ म्हणून नमूद केलेल्या मालमत्ता प्रत्यक्षात मेवाड राजघराण्याच्या वंशपरंपरागत वारशाचा भाग आहेत. सिटी पॅलेस, राजवाडे, हॉटेल्स आणि संबंधित जमिनी या कोणत्याही एकट्या व्यक्तीची खासगी मालमत्ता असू शकत नाहीत, असा त्यांचा दावा आहे.
या प्रकरणी वेगवेगळ्या उच्च न्यायालयांत याचिका दाखल झाल्याने निर्माण झालेला न्यायालयीन गुंता लक्षात घेता, सर्व प्रकरणे दिल्ली उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. मेवाड राजघराण्याच्या संपत्तीवरूनचा वाद नवा नसून, १९८० च्या दशकातही यासंदर्भात मोठा न्यायालयीन संघर्ष झाला होता.
ऐतिहासिक वारसास्थळांचा समावेश असल्याने मेवाड राजघराण्याच्या स्थावर-जंगम मालमत्तेचे नेमके मूल्यांकन करणे अवघड ठरत आहे. सरकारी पातळीवरही या मालमत्तांची अधिकृत किंमत उपलब्ध नाही. मात्र, हा वाद केवळ कौटुंबिक नसून राजस्थानच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी निगडित असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


