
नवी मुंबई प्रतिनिधी
देशातील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (NMIA) पहिला टप्पा आज अखेर राष्ट्राला समर्पित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांच्यासह विमानतळाचे बांधकाम करणारे उद्योगपती गौतम अदाणी उपस्थित होते.
Navi Mumbai, Maharashtra | Prime Minister Narendra Modi felicitated in Navi Mumbai
PM Modi inaugurated Phase 1 of the Navi Mumbai International Airport, built at a cost of around Rs 19,650 crore.
(Source: DD News) pic.twitter.com/JP22TMGZoh
— ANI (@ANI) October 8, 2025
सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टर्मिनल-१ तयार
या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील टर्मिनल-१ आणि रनवे-१ यांचे काम पूर्ण झाले असून मोदींनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन ते उद्घाटन केले. मुंबईनजीक उभारण्यात आलेला हा विमानतळ चार टप्प्यांत विकसित होणार आहे. प्रत्येक टप्प्यात प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता वाढत जाणार आहे.
पहिल्या टर्मिनलच्या उभारणीस तब्बल सात वर्षांचा कालावधी लागला. २०१८ मध्ये भूमिपूजन झाल्यानंतर जमिनीचे अधिग्रहण, स्थानिकांचा विरोध, पर्यावरणीय अडथळे आणि तांत्रिक प्रक्रिया या सर्व आव्हानांना सामोरे जात हे काम पुढे सरकले. अखेर २०२५ मध्ये हा पहिला टप्पा पूर्ण झाला. डिसेंबर महिन्यापासून प्रवासी वाहतूक सुरू होणार असून कार्गो ऑपरेशनसाठी आणखी दोन महिने लागण्याची शक्यता आहे.
अदाणी-सिडकोची संयुक्त भागीदारी
या विमानतळाचा प्रकल्प अदाणी गट व सिडको यांच्या संयुक्त भागीदारीत उभारला जात आहे. अदाणी गटाकडे ७४ टक्के तर सिडकोकडे २६ टक्के मालकी आहे. २०२१ मध्ये अदाणी गटाने विमानतळ प्रकल्पात औपचारिक प्रवेश केला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ताणाला तोड देणारे हे केंद्र आगामी काळात आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक ठरणार आहे.
नावाबाबतची उत्सुकता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक शेतकरी नेते आणि जनतेच्या मागणीनुसार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीसंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन यापूर्वी दिले होते. त्यामुळे मोदी आपल्या उद्घाटनपर भाषणात यासंबंधी काही घोषणा करतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
मेट्रो-३चा अखेरचा टप्पा आणि ‘मेट्रो वन’ अॅप
पंतप्रधानांच्या या दौऱ्यात मुंबई मेट्रो-३ च्या अखेरच्या टप्प्याचे (वरळी नाका- कफ परेड) उद्घाटन करण्यात आले. यामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच सर्व मेट्रो मार्गांवर एकसमान वापरता येईल असे ‘मेट्रो वन’ हे कॉमन मोबिलिटी अॅप मोदींच्या हस्ते लाँच करण्यात आले. या अॅपच्या मदतीने मेट्रोसह इतर सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच तिकीट वापरण्याची सोय प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
मुंबईचा ताण कमी करणारा विमानतळ
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसेंदिवस वाढणारा ताण आणि गर्दी लक्षात घेता नवी मुंबई विमानतळाची उभारणी हा ऐतिहासिक निर्णय मानला जातो. प्रवासी संख्येची प्रचंड वाढ, मालवाहतुकीचे जागतिक प्रमाण आणि आर्थिक केंद्र म्हणून मुंबईचे महत्त्व या सर्व गोष्टींना आधार देणारे हे विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असल्याने महाराष्ट्रासह देशाच्या विकासाच्या दृष्टीने नवा अध्याय सुरू होणार आहे.
सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्राला समर्पित झालेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ पायाभूत प्रकल्प नसून, महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा नवा टप्पा मानला जात आहे.