नवी मुंबई प्रतिनिधी
सामान्यांच्या गृहनिर्माण स्वप्नाला गती देत सिडकोने नवी मुंबईत मोठी योजना जाहीर केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या या योजनेत तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली परिसरातील तब्बल ४५०८ घरांची विक्री ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ या तत्त्वावर केली जाणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, अर्ज केलेल्या पात्र व्यक्तींना शंभर टक्के घर निश्चित मिळणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांमध्ये या घरयोजनेबाबत चर्चा सुरू होती. लॉटरी २०२६ पर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात होती. मात्र अखेर सिडकोने आज ही प्रतिक्षित गृहनिर्माण योजना जाहीर केली.
या योजनेत सोडत न लावता नागरिकांना थेट इच्छेनुसार घर निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. सिडकोच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची योजना राबवली जात असून, याआधी म्हाडाने अशा पद्धतीचा प्रयोग केला आहे.
अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू
सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, या घरांसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा आजपासून उपलब्ध झाली आहे.
२२ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील.
२८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पात्र अर्जदारांना घर निवडण्याची परवानगी असेल.
निवडलेल्या घराची रक्कम भरताच तात्काळ ताबा दिला जाणार आहे.
मात्र अंतिम मंजुरी आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच मिळेल.
प्रमुख वाटप — ईडब्ल्यूएस व एलआयजी गटांना मोठा दिलासा
एकूण ४५०८ घरांपैकी
• १,११५ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS)
• ३,३९३ घरे अल्प उत्पन्न गटासाठी (LIG)
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार असून, ईडब्ल्यूएस गटासाठी राज्य सरकारकडून २.५ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध राहणार आहे.
वाढत्या घरांच्या किमतीत दिलासा
मुंबईचा वाढता रिअल इस्टेट दर आणि उपनगरातील परवडणारी घरे कमी होत चालल्याने मध्यमवर्गासाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
नोंदणी कुठे कराल?
सिडकोची अधिकृत वेबसाइट : cidcofcfs.cidcoindia.com
येथे घरांचे क्षेत्रफळ, किंमत, प्रकल्पांची माहिती आणि नोंदणीची प्रक्रिया सविस्तर उपलब्ध आहे.


