नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई पोलीस दलाची प्रतिमा हादरवणारी आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराचा लेडीज बारमधील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. संबंधित पोलीस हवालदाराला तातडीने निलंबित करण्यात आले असून या प्रकरणामुळे पोलीस शिस्त, नैतिकता आणि विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बारमध्ये मद्यप्राशन करत नृत्य करणाऱ्या महिलांवर पैसे उडवत असल्याचा व्हिडीओ पोलीस हवालदार अनिल सुखदेव मांडोळे (पोहवा/१३२) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे मांडोळे हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात कार्यरत होते. अनैतिक कृत्यांना आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यानेच अशा प्रकारच्या आस्थापनेत जाऊन उघडपणे गैरवर्तन केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) सचिन बाबासाहेब गुंजाळ यांनी ९ जानेवारी २०२६ रोजी मांडोळे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. शिस्तप्रिय पोलीस सेवेला न शोभणारे वर्तन केल्याचा ठपका निलंबन आदेशात नमूद करण्यात आला आहे. जबाबदारीच्या पदावर असताना अशा ठिकाणी उपस्थित राहणे आणि सार्वजनिकरित्या आक्षेपार्ह वर्तन करणे हे गंभीर शिस्तभंग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी नवी मुंबईत गोपनीय भेट दिल्याची माहिती पुढे आली आहे. या भेटीनंतर पोलीस प्रशासनात हालचालींना वेग आला असून अंतर्गत चौकशी अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अलिकडच्या काळात नवी मुंबई पोलीस दलाशी संबंधित वादग्रस्त घटनांची मालिका समोर येत असून, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतीलच अधिकारी अशा प्रकारे वागत असल्यास समाजाचा पोलीस व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होण्याचा धोका निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


