
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबईतील वाशी परिसरात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने हाहाकार माजवला. सेक्टर १४ येथील एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सी सोसायटीमध्ये लागलेल्या या आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका सहा वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे १२.४० वाजता दहाव्या मजल्यावरून आग लागली आणि काही मिनिटांतच ती ११व्या आणि १२व्या मजल्यावर पसरली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
या दुर्घटनेत वेदिका सुंदर बालकृष्णन (वय ६), कमला हिरल जैन (वय ८४), सुंदर बालकृष्णन (वय ४४) आणि पुजा राजन (वय ३९) या चौघांचा मृत्यू झाला. तर अग्रवाल, जैन आणि घोष कुटुंबातील दहा सदस्य जखमी असून त्यांच्यावर हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्रीच्या काळोखात पेटलेल्या या आगीने काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला चटका लावला. रहिवाशांनी जीव मुठीत धरून जिन्याने खाली पळ काढला. काहींनी बाल्कनीतून मदतीसाठी आरडाओरडा केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून अनेकांना सुरक्षित बाहेर काढले.
कामोठ्यातील आंबे श्रध्दा सोसायटीतही भीषण आग; आई-मुलीचा मृत्यू
वाशीतील दुर्घटनेनंतर काही तासांतच नवी मुंबईतील कामोठे सेक्टर ३६ मध्येही आगीचा कहर पाहायला मिळाला. आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत आई आणि मुलीचा होरपळून मृत्यू झाला.
सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रुम क्रमांक ३०१ मध्ये झालेल्या स्फोटानंतर आग झपाट्याने पसरली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सोसायटीतील नागरिकांनी वेळीच बाहेर पडून जीव वाचवला, मात्र आई आणि मुलगी घरातच अडकून राहिल्या. दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, पण आत जाईपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेमुळे कामोठे परिसरात शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीच्या सणात सलग दोन ठिकाणी लागलेल्या या आगींनी नवी मुंबईकरांना हादरवून सोडले आहे.